मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना मानसोपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. तर, उद्धव ठाकरे यांनी सोडलेला बाण आरपार घुसला आहे. ही तर मिरच्यांची धुरी आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती हल्ला चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
जे कालपर्यंत मुख्यमंत्री होते, बॉस होते. आज त्यांची हालत काय आहे? दोन दोन उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत आहेत. हे मुख्यमंत्री त्यांना ज्युनिअर होते, त्यांच्या हाताखाली आता हे काम करत आहेत. संपूर्ण सरकार दिल्लीतून सुरू आहे. त्यामुळे फ्रस्टेशनमध्ये फडणवीस बोलत आहेत. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर प्रचंड खाली आणला आहे. त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. त्यांच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. त्यांच्या लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत विचारल्यावर ते उत्तर देत नाहीत, अशी टीकाच संजय राऊत यांनी केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांना झाकीर नाईकचे पैसे मिळाले. राहुल कूल यांनी 500 कोटींचे मनी लँड्रींग केले. अजित पवार यांचा घोटाळा 70 हजार कोटीचा, दादा भुसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप, हसन मुश्रीफ आणि भुजबळांबाबत त्यांच्याकडे उत्तर नाहीये. फडणवीस स्वत: कलंकित लोकांना गोळा करून आमच्यावर बोट दाखवत आहेत. फडणवीस यांनी उत्तर द्यावं. ते कलंकित आहे की नाही? असतील तर तुमच्यासोबत कसे बसले? ते सांगा, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.
उद्धव ठाकरे बोलले. बाण आरपार घुसला. मिरच्या आरपार घुसल्या. ही मिरच्यांची धुरी आहे. वर्षभरापासून ज्यांनी महाराष्ट्र कलंकित केला त्या कलंक शब्दावर बंदी आहे का? फडणवीस यांना लवकर मिरच्या झोंबतात. हे त्यांचं फ्रस्टेशन आहे. ते उफाळून येत आहे. चक्की पिसिंग म्हणत होता त्यांच्या बाजूला बसता? आज हसन मुश्रीफ तुमचे सहकारी आहेत. हा महाराष्ट्राला कलंकित करण्याचा प्रकार आहे की नाही सांगा? आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा ते उसळतात, चिडतात आणि त्यांचा उद्रेक होतो. त्यामुळे ते अशी वेडीवाकडी विधानं करणारच, असा चिमटाही त्यांनी काढला.
राष्ट्रवादीचे आमदार केवळ दोन गोष्टीसाठी युतीत गेले. ईडीची चौकशी सुरू होती. ती दाबण्यासाठी गेले आहेत. बंगले आणि संरक्षणासाठी गेले. त्यांना संरक्षण दिलं आहे. त्यांच्यावर कलंक आहे. जे लोक महाराष्ट्रावर कलंक लावत असतील तर त्यांना कलंकीत म्हणणारच. महाराष्ट्र असो की गुजरात हे सरकार गँगच आहे. दाऊद आणि यांच्यात काय फरक आहे? असा सवाल त्यांनी केला.