नवी दिल्ली : राज्यापाठोपाठ आता केंद्रातही शिवसेनेला मोठा हादरा बसलाय. शिवसेनेचे 12 खासदार आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत आपल्या वेगळ्या गटाला पाठिंबा देण्याची मागणी केलीय. इतकंच नाही तर शिंदे गटात सहभागी झालेले खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात 1 तास बैठक झाल्याचा गौप्यस्फोट शेवाळे यांनी केलाय. तत्पूर्वी आज सकाळी माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. रामदास कदम यांच्या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
संजय राऊत म्हणाले की, रामदास कदम आणि आम्हा सगळ्यांना पक्षानं खूप दिलं. मलाही काही मिळालं नसेल पण मी मनात ठेवलं. मला कधीही मंत्रिपद मिळालं नाही. त्यांना अनेक मंत्रिपदं मिळाली. शिवसेना आमची आई आहे आणि त्या आईचं दूध पिऊनच आम्ही मोठे झालो. त्याचबरोबर संजय राऊत म्हणाले की, माझ्यावर किंवा विनायक राऊत यांच्यावर कोणताही प्रश्न उपस्थित करणं मुळातच चुकीचं आहे. प्रलोभनं आणि दबाव आमच्यावरही आहे. प्रलोभनावर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करुन दाखवतो आणि दबावाला आम्ही झुगारून लावतो. वाईट काळात आम्ही पक्षासोबत आहोत, आमची निष्ठा पक्षासोबत आहे.
राहुल शेवाळे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारलेल्या प्रश्नालाही संजय राऊतांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात. महाविकास आघाडी करतानाही त्यांनी भाजप आपली गळचेपी करत असल्याचंही आम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं. ज्यांनी आपला अपमान केला, मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला नाही, त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असल्याचं राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे किंवा ठाकरे कुटुंबाचे संबंध बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चांगलेच आहेत. आता मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत ज्या कुणी गौप्यस्फोट केलाय. कदाचित त्यांना मोदींनीच सांगितलं असेल की आमच्या बैठकीत असं असं झालं होतं. 2014 ला भाजपनं जेव्हा शिवसेनेसोबत युती तोडली तेव्हा यातील किती जणांनी प्रश्न विचारले होते? तेव्हा आमच्या मनात युती करावी हाच विचार होता. आज आम्हाला विचारतात युती का तोडली? तेव्हा कितीजण प्रश्न विचारत होते. युती तोडण्यास शिवसेना जबाबदार नाही, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.
2014 पासून पुढील संपूर्ण काळ कोण होतं भाजपला उत्तर देण्यासाठी? महाविकास आघाडीच्या काळात बाळासाहेब आणि शिवसेनेवरही हल्ले झाले, त्यावेळी यातील कितीजण होते हल्ले परतवून लावण्यासाठी? एनडीएतून आम्ही बाहेर पडलो हे आम्ही आधीच स्पष्ट केलंय. आता काय कोर्टातून अॅफिडेव्हीट करायचं आहे का? ते काहीही बोलतील. आम्ही एनडीएतही नाही आणि यूपीएतही नाही.
शिवसेना भाजप युतीचा शब्द पाळला गेला असता तर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. पण भाजपनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हा एकनाथ शिंदे यांची फसवणूक भाजपनंच केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची जेव्हा बैठक व्हायची तेव्हा ते एकनाथ शिंदे हेच आपले मुख्यमंत्री असतील असं सांगत होते. आजही ते खासदार तांत्रिक दृष्या शिवसेनेचे खासदार आहोत. एकाच पक्षात आहोत. इथेच आमच्या जेवणावळी उठल्या आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. आम्ही त्यांना निवडणुकीत उत्तर देऊ, असा इशाराच संजय राऊतांनी बंडखोर खासदारांना दिलाय.