नाशिक : शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) यांच्यातील जागा आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोरच ठरला आहे. त्यानुसार जागा आणि सत्तेमध्ये 50-50 टक्के वाटा सेना-भाजपचा (Shiv Sena BJP) असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत(Sanjay Raut) यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, “विधानसभेसाठी सेना-भाजपचा फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला अमित शाहांसमोरच ठरला आहे. सत्ता आणि जागांमध्ये अर्धा अर्धा वाटा असेल”
छगन भुजबळांबाबत प्रतिक्रिया
दरम्यान छगन भुजबळांविषयी शिवसैनिकांनी काहीच मत व्यक्त केलं नाही. मी आहे तिथेच खुश आहे असं भुजबळ म्हणालेत, त्यांच्या भावनांचा सन्मान राखला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
आमच्या पक्षात वॉशिंग मशीन नाही, त्यामुळे माणसं पारखून घ्यावी लागतात, असं म्हणत त्यांनी रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
लोकसभेवेळी काय ठरलं होतं?
दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. त्यावेळी लोकसभेला शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
दुसरी अट म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल, त्यामुळे पद आणि जबाबदाऱ्या यांचंही समान वाटप होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.
विधानसभेपूर्वी भाजपचा नवा सर्व्हे, महायुतीला तब्बल 229 जागांचा अंदाज
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election) जशी जवळ येत आहे, तशी राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधीपक्ष देखील वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला (BJP-Shivsena Alliance) 288 पैकी 229 जागा मिळत आहेत, असा सर्वे समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने महायुती लक्षात घेऊनच हा सर्व्हे (BJP Survey) केला आहे.
भाजपनं महायुती लक्षात घेऊन सर्व्हे केल्याने भाजप-शिवसेनेत कुरबुरी होत असल्या तरी ते एकत्रित निवडणूक लढतील, हे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप पुन्हा जिंकणार असल्याचे सांगत आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी महाजनादेश यात्रेच्या (Mahajanadesh Yatra) माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. स्वतः अमित शाह यांनी यात सहभागी होऊन फडणवीसांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.
दुसरीकडं भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने देखील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्याचं चित्र आहे. तशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी आदित्य ठाकरे राज्यभरात फिरत आहेत. शिवसेनेकडून त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
संबंधित बातम्या
युतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेच्या या तीन अटी भाजपकडून मान्य