गजानन उमाटे, नागपूरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) हे सरकार लादलेलं आहे. सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची ते पाठराखण करत आहेत. सध्या ते जी सारवासारव करत आहेत, ते मनातून करत नाहीयेत. एका अपरिहार्यतेतून ते हे सगळं करत आहेत, असं मोठं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. शिंदे गटातील (CM Eknath Shinde) भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घालण्यात भाजपाला कठीण जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत यांच्याविरोधात भूखंड घोटाळ्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नागपुरातील एनआयटी भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत.
विरोधी बाकावर असताना भ्रष्टाचाराची प्रकरणं अत्यंत समर्थपणे लावून धरणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आता भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करावी लागतेय, हे पाहून त्यांची सहानुभूती वाटतेय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
ते म्हणाले, ‘ फडणवीसांनी विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला. मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी दटून राहिले. आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहेत. आमच्यासाठी यावेळेला सीमा प्रश्नावरचा ठराव महत्त्वाचा आहे. बॉम्बस्फोटात सीमाप्रश्नावरचा ठराव वहावून जाऊ नये. म्हणून आज आम्ही त्यावर फार बोलणार नाहीत…
सीमावादाचा प्रश्न सुटेपर्यंत तो प्रदेश केंद्रशासित करावा, हा मुद्दा काल उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत मांडला. त्यानंतर आज सरकार या मुद्द्यावरून ठराव मांडणार आहे. मात्र हा ठराव अत्यंत बुळचट असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
हा ठराव नसून बेडकांचा डराव आहे, अशी टीका राऊत यांनी केली. विरोधकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बॉम्ब नसून लवंगी फटाके आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. त्यावरूनही संजय राऊत आक्रमक झाले.
अब्दुल सत्तार यांनी 36 एकर जमीन वाटली… कृषी महोत्सवासाठी काही कोटींची ठेकेदारी केली. मुख्यमंत्र्यांनी एनआयटीचे 16 भूखंड ज्या पद्धतीने वाटले गेले. संजय राठोडांवरही आरोप आहेत.
पण यावर काहीही कारवाई होत नाहीये. आजपर्यंत एवढे पक्षपाती विधानसभा अध्यक्ष पाहिले नाहीत. आता विधानसभा अध्यक्षांनी वेलमध्ये येऊन भाजपच्या घोषणा देणं बाकी आहे… असा टोमण त्यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपला पूर्व इतिहास लढण्याचा विसरू नये. भविष्यात या लढ्यात त्यांना यावच लागणार आहे. भ्रष्ट सरकारचं ओझं घेऊन फार काळ सरकार चालवता येणार नाही…
फडणवीस यांनी किमान नैतिक पातळी राखली पाहिजे. त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
संपूर्ण सरकार अडचणीत आहे. फडणवीस मनापासून सारवासारव करत असतील असं नाही. त्यांची मजबुरी आहे. त्यांच्यावरती लादलेलं सरकार आहे. आम्हाला सहानुभूती आहे, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली.