मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा असाच हा आरोप आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच याबाबतचे पुरावे लवकरच देणार असल्याचंही त्यांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातून अनेक तुरुंगातील भयंकर गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. काही लोकांना जामीन देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबतचे लवकरच पुरावे देईल. 302च्या गुन्ह्याखाली आत असलेल्या गुन्हेगारांना निडवणुकीपूर्वी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी गुन्हेगारांशी डिलिंग सुरू आहे. काय करत आहेत गृहमंत्री? या गोष्टीचा देवेंद्र फडणवीस यांना राग आला पाहिजे. मी लोकप्रतिनिधी आहे. राजकारण नंतर. समजून घ्या आम्ही काय सांगतो ते. तुम्ही घटनात्मक पदावर आहात मिस्टर फडणवीस. आमचं काय वाकडं करणार आहात? जे करायचं ते करा. हिंमत असेल तर आमनेसामने लढा, असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंगातील गुन्हेगारांशी कसा संवाद सुरू आहे याची माहिती मी देणार आहे. सरकारमधील लोक मुंबईपासून नाशिकपर्यंतच्या तुरुंगातील कैद्यांशी संवाद साधून आहेत. तुरुंगातून मोबाईलचा वापर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जे सुरू आहे ते लवकरच बाहेर काढेल. तुम्ही गृहमंत्री आहात त्यावर ध्यान द्या. तुमचं फ्रस्ट्रेशन बाहेर काढू नका, असंही ते म्हणाले. तुरुंगाच्या दारात कैद्यांची भेट घेतली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष ठेवा. मुख्यमंत्री कार्यालयात अंडरवर्ल्डची टोळी बसली आहे, अशी टीका त्यांनी केली.
मंत्रिमंडळ विस्तारावरूनही त्यांनी महायुतीवर टीका केली. महायुती म्हणजे एक टोळी आहे. हे लोक मंत्रिपदासाठी आपआपसात लढत आहेत. उद्या मंत्रिपदासाठी एकमेंकांच्या अंगावर हात टाकतील. अजित पवार आल्यावर त्यांचं अस्तित्व संपलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.