मुंबई : संजय राऊतांच्या घरी ईडीचे अधिकारी अन् बाहेर विरोधकांकडून सडकून टिका असेच चित्र निर्माण झाले आहे. जर पत्राचाळ प्रकरणात त्यांनी चुकीचे काही केले नसेल तर भिण्याचे काय कारण असं म्हणत जो तो त्यांच्या बोचरी टिका करीत आहे. संजय शिरसाट यांनी त्यांना सुनावल्यानंतर आता रामदास कदमांनीही डिवचले आहे. संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती असा टोला कदमांनी लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शरद पवार यांचाच अधिक प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी जर शरद पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते असेच कदमांना यातून सूचित करायचे होते. एकीकडे गेल्या 3 तासांपासून राऊतांची चौकशी सुरु आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून आरोपही सुरु आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजप सोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचे रामदास कदमांनी सांगितले आहे. युती केली मात्र, ज्यावेळी निधीवाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी का यांनी आपला स्पष्टोक्तेपणा दाखवला नाही. त्यांनी आपला स्वार्थ साधला आणि आमदारांना वाऱ्यावर सोडले. उध्दव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेतल त्यांनी ही सर्व जुळवाजुळव केल्याने महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे कदमांनी सांगितले आहे.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही सर्वात कमी निधी हा सेनेच्या आमदारांनाच होता. जर शिवसेनेबद्दल एवढे प्रेम होते तर आमदारांवर अन्याय होताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका का मांडली नाही. ते शिवसेनेचे नेते असले तरी त्यांनी कायम राष्ट्रवादीचे हित जोपासण्याचा प्रयत्न केल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यानंतर कॉंग्रेसच्या आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना केवळ 17 टक्के निधी या आमदारांना हा कोणता न्याय असा सवाल त्यांनी नेतृत्वाला आणि राऊतांनाही विचारला आहे.
गेल्या अडीच वर्षात पक्ष वाढीसाठी तर काही नाही पण पक्ष फोडण्यामध्ये राऊतांचा मोठा रोल असल्याचा आरोप कदमांनी केला आहे. राष्ट्रवादीचे संबंध जोपासण्यासाठी एवढा सर्व खटाटोप केला आणि दुसरीकडे ज्ञान पाजळत शिवसैनिकांना दूर केले. तुमच्यामुळेच शिवसेना फुटली आणि आज ही वेळ पक्षावर आली आहे. शिवाय नेतृत्वानेही त्यांचचे ऐकल्याने सध्या पक्षाची ही अवस्था झाल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.शरद पवरांना सांगून थोडीतरी शिवसेना शिल्लक ठेवा असे सांगितले असते पक्ष जीवंत राहिला असता असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.