मुंबई: एनडीएने (NDA) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनाही बोलावलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी टीका केली आहे. फुटीरगटांना बोलावून एनडीएने नेहमीच सन्मान दिला आहे. अशा गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत. चिराग पासवानला बोलावून असाच सन्मान दिला होता. पण भविष्यात कोणी कुणाला सुरक्षित समजून नये. राजकारणात प्रत्येकाच्या हातात खंजीर आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येकापासून खतरा आहे असं मला वाटतं. आम्हाला कुणाचा खतरा नाही. जे व्हायचे ते झाले, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे तो भाजपला (bjp) पाठिंबा दिला असं होत नाही, असं सांगतानाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायाचा याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. तेच याबाबत निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या इतर प्रश्नांचीही उत्तरे दिली. द्रोपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत. राष्ट्रपतीपदी पहिल्या आदिवासी महिला बसण्याचा मान त्यांच्याकडे जाणार आहे. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेतही आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहेत. काल निर्मला गावित, आमशा पाडवी, शिवाजीराव ढवळे बैठकीला होते. प्रत्येकाचं मत समजून घेतलं. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे ते येत्या एक दोन दिवसात निर्णय घेतील, असं राऊत म्हणाले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकभावना पाहिली जाते. यापूर्वी आम्ही अनेक वेगळेन निर्णय घेतले होते. एनडीएत असूनही आम्ही प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. शिवसेनेला अशा पद्धतीने निर्णय घेण्याची परंपरा आहे. पक्षप्रमुख हे दबावाखाली निर्णय घेत नाहीत. त्यांचा निर्णय सर्वांना बंधनकारक असतो, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, विरोधी पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निडवणुकीत यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधकांच्या बैठका झाल्या. या बैठकांना शिवसेनेचे प्रतिनिधीही हजर होते. सर्वसंमतीने सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, सेनेतील फुटीनंतर खासदारांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला आहे. खासदारांची नाराजी ओढवून घेऊ नये म्हणून उद्धव ठाकरे मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. दोन दिवसात उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करू शकतात. त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.