नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्यावर टीका केली आहे. सध्या राज्य ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यावर राज्यपालांनी दुर्लक्षच केलं नाही तर राज्यपाल हे दरवाजे खिडक्या बंद करून बसले आहेत. त्यांना आता काहीच दिसत नाही. कायद्याची पायमल्ली दिसत नाही. बेकायदेशीरपणे घेतलेले निर्णय दिसत नाहीत. राज्यात जो रोष निर्माण झाला आहे, तो दिसत नाही. त्यांनी दरवाजे खिडक्या अशाप्रकारे बंद केल्या आहेत की बाहेर जो आक्रोश सुरू आहे त्याची तिरीप सुद्धा त्यांना दिसत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत मला माहीत नाही. मी अत्यंत लहान कार्यकर्ता आहे. तळागाळातील कार्यकर्ता आहे. मला यातील काहीच माहीत नाही, असंही राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
कॅबिनेटमध्ये किमान 12 मंत्री असावे लागतात, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरून भाजपने राऊतांवर हल्लाबोल केला होता. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्हाला पूर्ण घटना माहीत आहे आणि भविष्यात या सरकारसोबत होणाऱ्या दुर्घटनाही माहीत आहेत. आम्हाला कायदा शिकवू नका. तुम्ही गेल्या काही वर्षात कायद्याची जी मोडतोड केली ते देश पाहतोय. हे सरकार सुद्धा कायद्याला धरून झालेलंच नाही. जर ते कायद्याला धरून झालं असतं तर एव्हाना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. ते झालंच नाही. याचं कारण कायद्याचा आणि घटनेचा काही तरी पेच निर्माण झाला आहे. नाही तर जे सरकार फक्त सत्तेसाठी निर्माण झालं आहे, जे आमदार केवळ मंत्रिपदासाठी फुटले आहेत ते इतके स्वस्थ का? कारण त्यांना माहीत आहे. आपण शपथ घेतली तर आपली आमदारकी धोक्यात येईल आपलं सरकार धोक्यात येईल, म्हणूनच ते स्वस्थ आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
राऊत यांनी राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचाही पुनरुच्चार केला. राष्ट्रपती राजवटीची मागणी म्हणजे ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. ठिक आहे, ते कायदेशीर आहे नाही तो नंतरचा भाग. पण नैतिकता काय आहे? या सरकारला नैतिकता काय आहे? सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. ती सुनावणी पूर्ण होईपर्यंत इथे राज्य नसावं, असं ते म्हणाले.
शिवसेनेचे काही खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे. त्यावर त्यांनी मी जर तरवर उत्तर देत नाही. त्याला काही अर्थ नाही. जेव्हा होईल तेव्हा पाहून घेऊ, असं म्हणाले. संजय मंडलिकांविषयी मला पूर्ण खात्री आहे. या बेईमानी विरोधात त्यांनीच पहिला मोर्चा काढला होता. राहिलं ते सोनं आहे. जे बाहेर गेले ते नकली आहे असं ते म्हणाले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवार ठरवण्यासाठी आज विरोधकांची दुपारी चर्चा होणार आहे. शरद पवारांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.