मुंबई: महाराष्ट्रात ज्या प्रकारे एक बेकायदेशीर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला ते पाहता हे सरकार लादलं आहे. त्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर करण्यात आला. त्याविरुद्ध शिवसेना (shivsena) महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. या देशात लोकशाही आहे की नाही? या देशातील कारभार राज्यघटनेनुसार चालतो की नाही? की तिथेही दाबदबाव आहे. याचा फैसला आज होणार आहे. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाकडे (supreme court) एका अपेक्षने पाहतोय. यावर शेवटी जे काही निर्णय घ्यायचा तो सर्वोच्च न्यायालय घेईल. पण कोर्ट आमच्या खिशात आहे. आमच्याच बाजूने लागेल अशी व्यक्तव्य काही लोकांकडून केली जात आहेत. त्यामुळे शंका निर्माण झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्या खिशात असूच शकत नाही. या देशाची न्याय व्यवस्था कुणाची बटिक असूच शकत नाही. गुलाम असूच शकत नाही. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने आम्ही कोर्टाकडे पाहतो, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत, आम्हीच जिंकणार आहोत. आमच्या बाजूने निर्णय लागेल. काय कोर्ट यांच्या खिशात आहे का? त्यांची बटीक आहे का? नाही, असं संजय राऊत म्हणाले.
गोव्यातही आमदार पळवले जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संपूर्ण देशात विरोधी पक्ष संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे. त्यामुळेच लोकशाहीला धोका आहे. राज्याबाबतचा जो निर्णय होईल, तो संसदीय लोकशाहीसाठी आशादायी असेल, असं ते म्हणाले.
महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे. त्याबाबतचं सुतोवाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. त्याचं त्यांनी स्वागत केलं. पवारांनी मांडलेली भूमिका समन्वयी आहे. आम्ही सर्व बसून चर्चा करू, असं त्यांनी सांगितलं.
औरंगाबादच्या संभाजीनगर करण्याच्या पवारांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवारांची एक भूमिका आहे. आमच्याशी चर्चा झाली नाही. समन्वय नव्हता एवढंच पवार म्हणाले. निर्णयाला विरोध केला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरे मुंबईत निष्ठा यात्रा काढत आहेत. त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ग्रासरुटची जनता फक्त शिवसेनेसोबत आहे. असली नकली आणि गटाचा प्रभाव राज्यातील लोकांवर नाही. मी काल नाशिकमध्ये होतो. लोक हजारोंच्या संख्येने मला भेटायला येत होते. बाळासाहेबांचं नावा वापरून आपल्या भाकऱ्या भाजू नये. मोठे उपकार होतील, असंही ते म्हणाले.