“अजित पवार निवडणूक हरणार”, संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “शरद पवारांनी तुम्हाला…”

| Updated on: Sep 09, 2024 | 10:36 AM

"आता तुम्ही खंजीर खुपसला असेल तर पश्चात्ताप करुन काय उपयोग", असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

अजित पवार निवडणूक हरणार, संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले शरद पवारांनी तुम्हाला...
Follow us on

Baramati Vidhansabha 2024 : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यातच आता बारामतीमधील जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले. यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही, याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आता पश्चात्ताप करुन काय उपयोग, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांनी निवडणुकांबद्दल केलेल्या एका विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर अजित पवारांनी फार स्पष्टपणे मत मांडलं. यावेळी त्यांनी अजित पवार हे बारामतीतून निवडणूक हरणार, हे निश्चित आहे, अशी भविष्यवाणीही केली.

संजय राऊतांची टीका

“अजित पवार हे बारामतीतून निवडणूक हरणार, हे निश्चित आहे. त्यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे आता मी त्यांच्यावर काय बोलू? तुम्ही तुमचे घर मोडलंत. तुमचा पक्ष सोडलात. शरद पवार जे तुमचे नेते आहेत आणि जे तुमच्या वडिलांसारखे आहेत, ज्यांनी तुम्हाला सर्व काही दिलं, त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. आता तुम्ही खंजीर खुपसला असेल तर पश्चात्ताप करुन काय उपयोग”, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘एकच दादा अजित दादांचा’ घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जेथे पिकते तेथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा, असे अजित पवार म्हणाले.