मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटकी अरेरावीला सामोरं जावं लागलं. बेळगावात हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी गेलेले मंत्री राजेंद्र यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संजय राऊत (Sanjay Raut Rajendra Patil-Yadravkar Belgaum) यांनी स्वत: बेळगावला जाण्याची घोषणा केली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करुन (Sanjay Raut Rajendra Patil-Yadravkar Belgaum) याबाबतची माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांची धक्काबुक्की. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखले. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय? मी उद्या बेळगावला जात आहे. पाहू काय घडतंय. जय महाराष्ट्र” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं. महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी उद्या बेळगावला जाण्याचा निर्धार केल्याने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलीसांची धक्काबुक्की..
हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्या पासून रोखले..महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय?
मी ऊद्या बेळगावला जात आहे.
पाहू काय घडतंय.
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) January 17, 2020
राजेंद्र पाटील यड्रावकर बेळगाव पोलिसांच्या ताब्यात
सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कर्नाटकात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Rajendra Patil-Yadravkar). बेळगावात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी 17 जानेवारीला आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आज शुक्रवारी बेळगावला पोहोचले. मात्र, हुतात्मा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यड्रावकर यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले (Rajendra Patil-Yadravkar).
यावेळी यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाला. यड्रावकर यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेळगाव पोलिसांनी कुणाचंही ऐकून घेतलं नाही आणि थेट यड्रावकर यांना ताब्यात घेतलं. बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात हा प्रकार घडला.
कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?
राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्यमंत्री ही खाती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत.