संजय राऊतांची माघार, इंदिरा गांधी-करीम लाला भेटीविषयीचं वक्तव्य मागे

| Updated on: Jan 16, 2020 | 1:38 PM

संजय राऊत सॉरी म्हणत असतील, आणि ते काँग्रेसला मान्य असेल, तर आम्हाला काही अडचण नाही' अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली

संजय राऊतांची माघार, इंदिरा गांधी-करीम लाला भेटीविषयीचं वक्तव्य मागे
Follow us on

मुंबई : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माघार घेतली आहे. इंदिरा गांधींविषयीच्या वक्तव्याने कोणी दुखावलं गेलं असेल, तर मी वक्तव्य मागे घेतो, अशी भूमिका संजय राऊत यांनी (Sanjay Raut U Turn on Indira Gandhi) घेतली आहे.

जेव्हा इंदिरा गांधींविषयी कोणी टीका टिपणी करत असे, तेव्हा काँग्रेसमधील माझे मित्र गप्प बसायचे, पण मी त्यांची बाजू उचलून धरायचो. परंतु माझ्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेला ठेच पोहचली, असं कोणाला वाटत असेल, त्या विधानामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझं वक्तव्य मागे घेतो, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांच्या आरोपांवर सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी गप्प का आहेत? काँग्रेसने राऊत यांच्या आरोपांना उत्तर न दिल्यास त्यांच्या वक्तव्यात तथ्य आहे, असं मानलं जाईल, असा घणाघात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

 

काँग्रेस नेते संजय निरुपम आणि मिलिंद देवरा या दोघांनीही संजय राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी केली होती.

‘लाथ मारायची, मग सॉरी म्हणायचं, ही इंग्रजांनी आणलेली पद्धत आहे. आता संजय राऊत सॉरी म्हणत असतील, आणि ते काँग्रेसला मान्य असेल, तर आम्हाला काही अडचण नाही’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी इतर नेते जसे जात होते, तसं इंदिरा गांधीही भेटत होत्या, असं संजय राऊत मुलाखतीत म्हणाले होते. त्यावरही संजय राऊत यांनी दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत पुन्हा स्पष्टीकरण दिलं. देशातील अनेक नेते करीम लाला याला भेटत होते. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संघटनेला अनेक नेते भेट देत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्याएवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्यावेळी काँग्रेसवालेही शांत होते, असं संजय राऊत म्हणाले होते. मात्र दुपारनंतर संजय राऊत यांनी वक्तव्य मागे घेतलं आहे.

करीम लाला कोण होता?

अब्दुल करीम शेर खान हे करीम लाला याचं संपूर्ण नाव. 1920 मध्ये तो अफगाणिस्तानहून आपल्या कुटुंबासह मुंबईला आला. दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात असलेल्या गरीब मुस्लिम वस्तीत त्याचं कुटुंब राहत होतं.

मुंबईतील पठाणांच्या एका संघटनेत करीम लाला कार्यकर्ता म्हणून सहभागी झाला. मारवाडी, गुजराती समाजातील सावकार, जमीनदार, व्यापारी यांच्यासाठी एजंट म्हणून अवैध वसुलीचं काम त्याने सुरु केलं.

करीम लाला-इंदिरा गांधींविषयी राऊतांच्या दाव्यानंतर फडणवीसांचे गांधी कुटुंबाला तीन प्रश्न

1960 ते 1980 च्या दरम्यान मुंबईतील तीन माफिया डॉनपैकी एक होता. दोन दशक तो खतरनाक पठाण गँगचा प्रमुख होता. पठाण गँगचा म्होरक्या झाल्यानंतर तो कुख्यात सुपारी किलर झाला. सत्तरच्या दशकात त्याने हाजी मस्तान आणि वरदराजनसोबत हातमिळवणी केली. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनाही तो आपल्या ‘दावत’चं निमंत्रण द्यायचा. 2002 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.

Sanjay Raut U Turn on Indira Gandhi