मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सकाळपासून ईडीची छापेमारी (Ed Raid) सुरू आहे. तसेच संजय राऊत यांच्या अडचणी आता पत्रचाळ प्रकरणात (PatraChowl Case) आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांची याच प्रकरणात चौकशी सुरू होती. तसेच संजय राऊत यांच्यावर भाजपकडून या प्रकरणात अनेक आरोप झाले आहेत. त्यानंतर आज सकाळी सात वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी आणि विविध ठिकाणी पोहोचलं होतं. त्यानंतरच ईडीने संजय राऊत यांच्यावर हे कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातल्या राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या ई़डी कारवाईवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने राज्यभर आंदोलन सुरू केलेली आहेत.
कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..
मी शिवसेनेसाठी लढत राहीन.— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केल्याबद्दलही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले भीती आणि धमक्यांमुळे लोक एकनाथ शिंदे गटात जात आहेत. ईडी संजय राऊत यांच्या घराबाहेर आहे. कोश्यारी यांच्या विधानाचा हा पुढचा टप्पा आहे. त्यांना हिंदूंमध्ये फूट पाडायची आहे जेणेकरून हिंदू आणि मराठींना वाचवणारा पक्ष शिल्लक राहणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
खोटी कारवाई..
खोटे पुरावे
मी शिवसेना सोडणार नाही..
मरेन पण शरण जाणार नाही
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर नागपुरात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नागपूरच्या व्हेरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत ईडी कारवाईचा निषेध केला आहे. सूडबुद्धीने संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई केली जात असून ईडी केंद्र सरकारच्या हातचा बाहुला बनल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. त्यामुळे राज्यातलं वातावरण चांगलेच तापलं आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आले आहेत.