मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपली भूमिका मांडल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलंय. वेळ आली तर सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करु असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहतील असंही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना आणि पर्यायानं महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केलीय.
संजय राऊत म्हणाले की, मी सकाळपासून वर्षा बंगल्यावर आहे. शरद पवारांपासून सर्व नेते याठिकाणी आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरुन मातोश्रीवर जात आहे. आम्हाला सत्तेचा मोह नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. पुन्हा सत्याचा विजय होईल. सर्व नेत्यांनी येऊन सद्धावना व्यक्त केल्या, आम्ही त्यांचे आभारी आहोत. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हेच कायम राहतील. वेळ आली तर सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, असा दावा राऊतांनी केलाय.
उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी मी नेमकं काय बोलणार? मला दुख कशाचं झालं? आश्चर्य कशाचं वाटलं? दुखं कशाचं वाटलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांचा विचार आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे असं सांगितलं, त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही? माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात, तुम्ही नकोत, असं त्यांनी बोलायला हवं होतं. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतो. मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात? त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केलाय.
आता एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून चार मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलंय.