नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (ED Arrested Sanjay Raut) यांच्या अटकेवरून संपूर्ण देशात मोठा राडा सुरंय. राज्यातले शिवसैनिक (Shivsena) तर आक्रमके होत रस्त्यावर उतरून आंदोलन करतच आहेत. मात्र दुसरी कडून देशातील लोकशाही संकटात आहे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. तर महाविकास आघाडीचे नेतेही हा लोकशाहीचा खून आहे. भाजप विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केवळ अशा कारवाया करवत आहे, अशी टीका होत असतानाच आता संजय राऊत यांच्या अटकेत आणखी एक नवं ट्विस्ट आलंय. संजय राऊत यांना अटक झाल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या ड्रायव्हरने थेट पेढे वाटप केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. फक्त पेढे वाटूनच हे थांबले नाहीत तर त्यांनी संजय राऊतांवरती जळजळीत प्रतिक्रिया दिलीय.
ईडीने संजय राऊत यांच्या घरावरती सर्वात आधी धाड टाकली. त्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेत त्यांची तब्बल 15 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक केल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ईडी संजय राऊत यांना ताब्यात घेताना महाराष्ट्र कमजोर होते, तुम्ही पेढे वाटा, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, असा टोला संजय राऊत यांनी बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांना लगावला होता, मात्र आता बाळासाहेब ठाकरे यांच्या ड्रायव्हरने संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे पेढे वाटले आहेत.
शिवसैनिक प्रकाश राजपूत असे या ड्रायव्हरचं नाव आहे. राजपूत हे पेढे देण्यासाठी थेट धुळ्यातून दिल्लीत पोहोचले आहेत. त्यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांनी शिवसेना संपवली, संजय राऊत यांनी खूप चुकीचं काम केलं, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर यावेळी निशाणही साधला आहे.
गेला एक महिन्यापूर्वी ज्या 50 आमदारांनी बंड केलं त्या बंडखोरांविरोधात टीका करण्यात संजय राऊत हे सर्वात आघाडीवर होते. हे बंडखोर आमदार महाराष्ट्रात परत आल्यापासून संजय राऊत यांच्या टिकीचे पुन्हा पुन्हा दाखले देत आहेत. तसेच संजय राऊत यांच्यामुळे ही शिवसेना संपली. संजय राऊत यांनी शिवसेनेचं वाटोळं केलं. संजय राऊत हे पवारांच्या मांडीवर जाऊन बसले, संजय राऊत हे शिवसेनेचे नाही तर राष्ट्रवादीचे काम करत आहेत, अशा अनेक टीका या बंडखोर आमदारांकडून रोज होत आहे. मात्र आता बाळासाहेबांचा जुना ड्रायव्हर आणि शिवसेनेचा एक कार्यकर्ता त्याच मूडमध्ये दिसून आल्याने संजय राऊत पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिले आहेत.