शिवसेनेवर संकट, संजय राऊत यांचं ‘हे’ पद जाणार, शिंदे गटाचं पुढचं टार्गेट काय?

| Updated on: Feb 21, 2023 | 11:21 AM

संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी आक्रमक सवाल केला. कार्यालयांचा ताबा  ते घेतील. पण महाराष्ट्रातील जनता खवळली आहे. त्यांचा ताबा कोण घेणार?...

शिवसेनेवर संकट, संजय राऊत यांचं हे पद जाणार, शिंदे गटाचं पुढचं टार्गेट काय?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः चहुबाजूंनी आव्हानांनी वेढलल्या शिवसेनेसमोर (Shivsena) आणखी एक मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचं संसदेतील मुख्यनेते पद जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. निवडणूक आयोगाचा (Election commission) निर्णय आल्यानंतर एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळतंय. याच मालिकेत आता संसदीय मुख्य नेते पद संजय राऊत यांच्याकडून काढून घेतलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांची यापदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिवसेनेतील प्रमुख पदे आता शिंदे गटाकडे जाणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर संजय राऊत यांच्या बाबतीत काय बदल घडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत काल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. सगळं आताच सांगू का, असा प्रति सवाल शिंदे यांनी केला.

एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्वीकारणार?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक आज बोलावली आहे. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. बैठकीला शिंदे गटाचे सर्व आमदार-खासदार उपस्थित राहणार आहे. याच बैठकीत संजय राऊत यांचं संसदीय प्रमुख पद काढून घेतलं जाणार असल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेचं पक्ष प्रमुख पद स्वीकारणार असल्याचीही चर्चा आहे.

खवळलेल्या शिवसैनिकांचा ताबा कोण घेणार?

शिवसेनेची सगळी कार्यालयं आणि पदांचा ताबा शिंदे गट घेत आहे. यावरून संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. कार्यालयांचा ताबा  ते घेतील. पण महाराष्ट्रातील जनता खवळली आहे. त्यांचा ताबा कोण घेणार?

संजय राऊत म्हणाले, शिवसेना महाराष्ट्राचा आत्मा, आवाज आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई, मराठी माणसांनी याची स्थापना केली. तीच शिवसेना खतम करण्यासाठी आपल्या देशात दिल्लीश्वरांनी ६० वर्षांपासून प्रयत्न सुरु केले. वेळोवेळी ते आम्ही हाणून पाडले. पण आता काही लोकांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळालं असलं तरी महाराष्ट्राची जनता या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली आहे. तुम्ही फक्त निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा…