मुंबई : राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रयेवरुन आता पक्षाचा कल आणि (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गटाची वाटचाल याचा अंदाज बांधावा लागत आहेत. शिंदे गटात आणि (Shivsena) शिवसेना पक्षात दरी वाढवण्याचे काम हे (Sanjay Raut) संजय राऊतांनी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांच्यासह सोशल मिडियावर होत असतानाच सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना राऊंच्या बोलण्यात नरमाईची झलक पाहवयास मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून बंडखोरांवर टोकाची टिका करणारे राऊत आज काहीसे मवाळ झाले होते. त्यामुळे परत या, आजही चर्चा करायला आम्ही तयार आहोत असे आवाहन त्यांनी बंडखोर आमदारांना केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे सध्याचे बंड कोणत्या स्टेपला जाणार हे आता तरी सांगता येत नाही.
शिवसेना पक्ष आणि शिंदे गटात केवळ संजय राऊत यांच्या प्रतिक्रीयांमुळे अधिक मतभेद वाढत आहेत. अशा प्रतिक्रिया देणारा नेता कुण्या पक्षाला मिळू नये असे दीपक केसरकर यांनी सुनावले होते. एवढेच नाहीतर सोशल मिडियामध्येही संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच हे मतभेद वाढत असल्याचा सूर उमटत होता. कदाचित त्यामुळेच सोमवारी सकाळी संजय राऊतांनी बंडखोर आमदारांबद्दल मवाळ भूमिका आणि भाजपवर टिकास्त्र कायम ठेवले. त्यामुळे भविष्यात शिंदे गट काय निर्णय घेतो हेच पहावे लागणार आहे.
बंडखोर आमदारांच्या मागे कोण आहे हे आता वेगळ्याने सांगायची गरज नाही. पण शिवसेनेत आत्मसन्मान आहे. भाजपामध्ये मात्र, गुलामगिरी पत्करल्याशिवाय सुरक्षा ही मिळणार नाही. त्यामुळे आजही चर्चेसाठी दारे खुली आहेत. स्वाभिमानाने या आणि खुली चर्चा करा अशी साद संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना त्यांनी घातली आहे. बंडखोर असले तरी सर्व आमदार हे जवळचे आहेत हे देखील सांगायला ते विसरले नाहीत. गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे, उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यासह सर्वजण हे जवळचेच असल्याचे राऊत यांनी सांगितले.
एकीकडे दिवसाकाठी शिंदे गटात आमदारांची संख्या वाढत आहे तर शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्याची संख्या घटत आहे. असे असतानाही बंडखोर आमदारांपैकी काहीजण आपल्या संपर्कात असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. शिवाय ईडी-सीबीआय हे तुम्हाला मतदान करणार नाहीत तर खरे मतदार हे राज्यात आहेत. त्यामुळे राज्यात या येथे सर्वकाही आहे म्हणत चर्चेची दारेही खुली असल्याचा पुन्नरउच्चार राऊतांनी केला आहे.