दिनेश दुखंडे, मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्यावर हल्ला होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात नवं सरकार आलं. या सत्तांतरानंतर माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे काढून घेण्यात आली आहे. अशा स्थितीत माझ्या जीवितास धोका असल्याची भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद चिघळला असताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी दुसऱ्यांदा अशा आशयाचं पत्र लिहिलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी यासंदर्भातील एक पत्र लिहिलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रात नमूद केलेली गंभीर बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव यात घेण्यात आलंय. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला या हल्ल्याची सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. यासंदर्भात माझ्याकडे पक्की माहिती असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
खा. संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्त तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातील पत्र दिलं आहे. त्या पत्रात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे-
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे
– आपला नम्र- संजय राऊत
कालच माजी मुख्यमंत्री आणि मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी असेच एक पत्र नांदेड पोलिसांना दिले आहे. माझ्यावर कुणातरी पाळत ठेवली जात आहे. एक व्यक्ती माझ्या बैठका आणि दौऱ्यांच्या माहितीचे संकलन करत असून माझा घातपात करण्याचा डाव आहे, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.