गिरीश गायकवाड, मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जम्मू-काश्मीरच काय तर अमेरिकेच्या (America) राष्ट्रपती पदाची निवडणुकही लढवावी.. देशात सगळीकडे डिपॉझिट जप्त झालेलं असताना यांच्यात कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो, असा शेलक्या शब्दात राऊत यांना डिवचलंय. शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. येत्या काळात शिवसेना जम्मू काश्मीरमधून निवडणूक लढवेल, येथील काश्मीरी पंडितांच्या समस्या सोडवेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी नुकतंच केलं. त्यावरून संजय शिरसाट यांनी त्यांची खिल्ली उडवली.
संजय शिरसाट म्हणाले, ‘ संजय राऊत म्हणतात की, जम्मूत निवडणुक लढवणार.. पण देशात सगळीकडे तर डिपॉझिट जप्त झालंय.. आम्ही त्यांना सांगणार की अमेरीकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणुकही त्यांनी लढवावी.. तिथेही फॉर्म भरावा… कुठून येतो एवढा कांफिडेंस..? हाच प्रश्न पडतो…
शिवसेना आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण यांसंबंधीची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये असंख्य चुका आहेत. हे त्यामुळे धनुष्यबाण आमचाच होणार आहे. आमचीच ताकद वाढणार.. उद्धव ठाकरे यांना आत्ता हे लक्षात येतंय, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.
संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यावरून संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय… ते जम्मूत जाऊन राहूल गांधींना भेटले आहेत.. पण सेना भवनात आत्ता राहूल गांधीला मिठी मारल्याचा फोटो लावतील…
नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला, यावरूनही शिरसाट यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ शुभांगी पाटील ह्यांना मविआने पाठींबा दिलाय म्हणजेच त्या हरतील आत्ता… कारण जसं राजकारण सुरू आहे त्याहून वाटतंय की त्यांचा पराजय निश्चित आहे, सत्यजित तांबे विजयी होतील…
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी येत्या महिनाभरात शिंदे-सरकार कोसळणार असल्याचं भाकित केलंय. त्यावरून शिरसाटांनी त्यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, ‘ अमोल मिटकरी हे नवे भविष्य सांगणारे… कदाचित त्यांनी अजित दादांचं वागणं पाहून हे ट्विट केलं असावं.. अजित दादा कुठे जातील.. याचं कदाचित त्यांनी भाकित केलंय…