कराड, सातारा : अजित पवार यांनी काल भाजपसोबत हातमिळवणी केली. अशात राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना, जनतेला विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. कराडमधील प्रीतीसंगमावर जात शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. तिथून शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.
प्रीती संगमावरून शरद पवार यांनी हात उंचावत उपस्थितांना अभिवादन केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं.
शरद पवार जेव्हा प्रीती संगमावर बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो…, शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत. येत्या काळात जनता त्यांना उत्तर देईल, असं शरद पवार म्हणालेत. सामान्य माणसांचा लोकशाही अधिकार जतन केला गेला पाहिजे, असंही ते म्हणालेत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती ज्यांनी केली ते कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना आज मी अभिवादन केलं. ज्यांनी राज्याच्या राजकारणात नवी पिढी तयार केली. तरूणांचा संच उभा केला. यशवंतराव आज आपल्यात नाहीत. चव्हाण साहेब आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला विचार आपल्यासोबत आहे, असं शरद पवार म्हणालेत.
महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही समाजविघातक प्रवृत्ती आहे. या समाजविघातक प्रवृत्तीच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे. एकोप्याने राहणाऱ्या समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. याच्या विरोधात लढण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणालेत.
फुले, शाहू, आंबेडकर आणि शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस हा एकवेळ उपाशी राहील पण महाराष्ट्रातील सामुहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. राज्यात उलथापालथ करणारी जी शक्ती आहे. त्यांना त्यांची योग्य जागा दाखवेन. असा मला विश्वास आहे, असं शरद पवार म्हणालेत.