सातारा | 24 ऑगस्ट 2023 : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सगळेच राजकीय पक्ष आपले अधिकाधिक उमेदवार निवडणूक येणार असल्याचा दावा करत आहेत. शिवसेना-भाजप आणि अजित पवार गटाच्या युतीतील नेते पुन्हा युतीचंच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा दावा करत आहेत. आमदार बच्चू कडू यांनीही प्रहारचे 10-11 आमदार निवडणून येतील असा दावा केला आहे. शिवाय कुणाचं सरकार सत्तेत येईल, याविषयीही त्यांनी मोठा दावा केला आहे. बच्चू कडू साताऱ्यात बोलत होते.
बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. आमचे 10 ते 11 आमदार निवडून येतील. आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल. आम्ही उठलो तर सरकार उठेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
येत्या काळात विधानसभा निवडणुका लागतील. यात युतीमध्ये किती जागा मागणार? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 जागा मागणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी साताऱ्यात सांगितलं आहे.
महायुतीत एकनाथ शिंदे,अजित पवार आणि भाजप एवढे पक्ष असताना तुम्हाला 15 जागा मिळतील का?, असा सवाल केला गेला तेव्हा तो अभ्यास त्यांनी करावा. ते माझे काम नाही, असं बच्चू कडू म्हणालेत. त्यामुळे येत्या काळात बच्चू कडू यांच्या प्रहारला युतीत किती जागा मिळतात आणि किती उमेदवार निवडून येतात हे पाहणं महत्वाचं असेल.
दोन दिवसाआधीही बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारला नामर्द संबोधलं होतं. केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतलाय, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर घणाघात केला होता. त्यानंतर आता आज त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं. म्हणून तुम्ही एवढे घाबरता का?, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला होता. केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सत्तेत असतानाही प्रसंगी सरकारविरोधी भूमिका घेणारे नेते, अशी बच्चू कडू यांची ओळख होत आहे.