सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. तिथे त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सामनातील अग्रलेखावरही शरद पवार यांनी परखड भाष्य केलं. तसंच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये आदेशाची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश एकनाथ शिंदे यांना मान्य करावा लागतो, असं शरद पवार म्हणाले.
अध्यक्षपदाचा राजीनामा आणि पक्षातील घडामोडी हा आमच्या घरचा प्रश्न आहे. 1999 साली सत्तेत गेले तेव्हा आम्ही अनके सहकाऱ्यांना कॅबिनेट मंत्री केलं आहे . आम्ही काय केलं त्यांना माहित नाही. महाविकास आघाडी वर काही परिणाम होणार नाही. आमच्यात काही गैरसमज नाही. आम्ही कुणाला संधी दिली, ते जाहीर करत नाही, असं शरद पवार म्हणालेत.
महाविकास आघाडीचे जागावाटपांबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही. परंतु जेव्हा मी मुंबईमध्ये जाईल उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासोबत चर्चा करेन. एक विश्वासदर्शक चित्र निर्माण करण्यात आमचा प्रयत्न असेल, असं शरद पवारांनी म्हटलंय.
कर्नाटक निवडणुकीवरही शरद पवार यांनी भाष्य केलंय. आम्ही मर्यादित जागांवर लढत आहोत, त्याचा काँग्रेस वर परिणाम पडणार नाही, असं शरद पवार म्हणालेत.
तुमच्या हातात सत्ता होती तेव्हा तुम्ही काय केलं ते सांगा, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. पृथीवराज चव्हाण यांना त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते त्यांनी सांगावं, असंही शरद पवार म्हणालेत.
शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर असं काही बोलू नये. पवार साहेबांनी त्यांच्यावर बोलू नये असं मला वाटतं, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. जबाबदार पदांवरील व्यक्ती अशी वक्तव्य करत असेल तर त्याकडे दुर्लक्षच करावं लागेल, असं पवार म्हणालेत.