औरंगाबाद: औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचा दावा केलाय. औरंगाबादेतील विभागीय कृषी कार्यालयात चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन टर्म आपण चांगलं काम केल्यामुळे मतदार आपल्यालाच निवडून देतील असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त करताना, आपण विजयाची हॅटट्रिक करणार, असंही चव्हाण म्हणाले.(Satish Chavan claims a hat trick of victory)
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी सध्या मतदान सुरु आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरिष बोराळकर आहेत. सतीश चव्हाण हे सलग दोन वेळा औरंगाबाद पदवीधरच्या जागेवर निवडून आले आहे. गेल्यावेळी चव्हाण यांच्याविरोधात बोराळकरच उभे होते. मात्र तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यंदा ही निवडणूक चुरशीची होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मराठवाड्यातील काही बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांकडे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम यंदाच्या पदवीधर निवडणुकीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपनं यंदा विजयासाठी कंबर कसल्याचं चित्र प्रचारादरम्यान पाहायला मिळालं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यांच्या गाठीशी दोन निवडणुकांचा अनुभव आहे. त्यामुळे औरंगाबाद पदवीधर मधून यंदा कोण बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सकाळी 10 वाजेपर्यंत 10 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर मोठ्या संख्येनं पदवीधर मतदान मतदानासाठी हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निर्मला दानवे आणि मुलगा आमदार संतोष दानवे यांनी मतदान केलं. जालनामधील भोकरदन इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्रावर दानवे परिवारानं मतदान केलं.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील मतदानाच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली. शिवसेना-भाजप हे विधानसभा निवडणुकीपूर्वी मित्र असलेले पक्ष आता आमनेसामने आहेत. त्यामुळे भाजप खासदार भागवत कराड आणि शिवसेनेच आमदार अंबादास दानवे यांच्यात जुगलबंदी रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं.
औरंगाबाद – 10 टक्के
हिंगोली – 5.95 टक्के
परभणी – 8.43 टक्के
उस्मानाबाद – 6.48 टक्के
संबंधित बातम्या:
चुरस आहे पण विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू, पुणे तर वनवेच!- चंद्रकांत पाटील
पदवीधर निवडणूक : विश्वजीत कदम आणि भाजप उमेदवाराची भेट, मतदाना दिवशीच्या भेटीने भुवया उंचावल्या
Satish Chavan claims a hat trick of victory