मुंबई : आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील घवघवीत यशानंतर देशभरातून अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचं अभिनंदन केलं जात आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी देखील आपचं दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केलं आहे (Satyajeet Tambe on Delhi election result). यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना देखील आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.
सत्यजीत तांबे म्हणाले, “काँग्रेसला खातंही उघडता न आल्याने भाजप आनंदी आहे. भाजपचा पराभव होऊन ते सत्तेपासून दूर राहिल्याने काँग्रेस आनंदी आहे. मात्र, माझ्यासाठी आपचा दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजय जास्त महत्त्वाचा आहे. आपण (काँग्रेसचे नेते) यावर विचार करणार आहोत की नाही? की आजचा दिवसही इतर दिवसांप्रमाणेच असणार आहे.”
BJP is happy as Congress is not able to open an account &
Congress is happy as BJP is losing & will be away from power.To me, AAP victory interests the most.
Are we ( congressis) going to think on it or today is just like an another day ? #DelhiElections— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 11, 2020
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 62 जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. (Delhi Vidhansabha Election Result) अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.
भाजपला केवळ 07 जागांवरच आघाडी घेता आली, तर काँग्रेसला पुन्हा एकदा शून्यावरच समाधान मानावं लागलं. अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. मात्र उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना शेवटच्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला.
या निवडणुकीत भाजपने जोरदार ताकद लावली होती. 70 जागांसाठी भाजपचे देशभरातील शेकडो खासदार दिल्लीत तळ ठोकून होते. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांचा ताफाही दिल्लीत कार्यरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या अनेक सभा झाल्या. पण तरीही भाजपला दिल्लीची सत्ता खेचून आणण्यात यश आलं नाही.
Satyajeet Tambe on Delhi election result