अभिजित पोते, साताराः आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Fule) यांची जयंती असल्याने त्यांच्या जन्मगावी मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) उपस्थितीत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . मात्र कार्यक्रमात एक अट घालण्यात आली आहे. कार्यक्रमात येणाऱ्या कुणालाही कोणत्याही प्रकारचा पेन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यक्रमात काही विघातक कृत्य घडू नये, कुणावर शाईफेकीची घटना घडू नये, यासाठी स्थानिक पोलिसांच्या वतीने ही खबरदारी बाळगण्यात येत आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते अजित पवार, छगन भुजबळ यांचीही उपस्थिती आहे.
नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारक परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादनासाठी आले. त्या अनुशंगाने पोलिसांकडून ही काळजी घेतली जात आहे. शाईचा पेन अथवा बॉल पेन ला सुद्धा स्मारक परिसरात पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील नायगाव या त्यांच्या जन्मगावी जाऊन स्मारकास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यानिमित्तानं साजरा होणाऱ्या ‘महिला शिक्षण दिना’च्या राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/cYdpAVccpv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 3, 2022
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर करण्यात आलाय. यासाठी कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीने लावून धरली आहे. मात्र केंद्रातील भाजप सरकारतर्फे अद्याप राज्यपालांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर मंत्री तसेच नेत्यांविरोधात कोणतीही निषेधात्मक कृती होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
राज्यात महापुरुषांवरील नेत्यांनी केलेल्या विरोधाभासी वक्तव्यांमुळे क्रिया-प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही अट घालण्यात आली.
सावित्री बाईंच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नायगावमध्ये दाखल झाले आहेत. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील उपस्थित आहेत.
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीत सावित्रीबाई फुले यांचं महत्त्वाचं योगदान आहे. जात आणि लिंगावर आधारीत भेदभाव झुगारुन देण्यासाठी त्यांनी मोठं काम केलं.
3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिवनन आणि महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.