नवी दिल्ली: राज्यातील सत्ता संघर्षावर (Power struggle) थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या (maharashtra) प्रकरणाची सुनावणी करणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहेत. पहिल्यांदाच ही सुनावणी पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठासमोर होणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षाचे अधिकार व अपात्र सदस्यां संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करणे त्याच्या अधिकाराची व्याप्ती यावरील न्यायालयीन पुनर्विलोकन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेली रिट पिटीशन मर्ज होण्याची शक्यता आहे. रिट पिटीशनसह आधी दाखल असलेल्या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घटनपीठासमोर होणार आहे, अशी माहिती सर्वोच न्यायालयाचे वकील राजसाहेब पाटील यांनी दिली.
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा घटनापीठात समावेश नाही. दरम्यान शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देऊ नये अशी याचिका दाखल करण्यात आलीय. यासाठी येऊ घातलेल्या महापालिका निवडणूकींचे कारण देण्यात आले आहे. निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष आणि चिन्ह कोणाचे हे ठरवण्याची गरज असल्याचं म्हणणं शिंदे गटाने रिट याचिकेत म्हटलंय. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आलीय. निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह आणि शिवसेना नाव संदर्भात निर्णय घेऊ शकेल का या मुद्द्यांवर आज सुनावणी होणार आहे.
आजच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज सुनावणी आहे आणि सुनावणी होत असताना त्या संदर्भात बोलणं अनुचित आहे. सुनावणी चालेल. आम्ही आमची बाजू मांडू. समोरचे लोक त्यांची बाजू मांडतील. पण कोर्टात सुनावणी असताना त्या संदर्भात बोलणं अनुचित आहे, अशी सावध प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर बोलण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर मी बोलणार नाही. जे काही होईल ते कायद्याने होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
1. धनंजय चंद्रचूड
2. न्या.एम आर शहा
3. न्या. कृष्ण मुरारी
4. न्या.हिमाकोहली
5. न्या. पी नरसिंहा