मुंबई: लोकसभा निवडणुकीला अवघे चार ते पाच महिने शिल्लक असताना, फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. कोकणात नारायण राणेंचे कट्टर समर्थक काका कुडाळकर यांनी भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यानंतर आता आणखी एक बडा मासा काँग्रेसच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील भाजपचा एक विद्यमान खासदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची तीन वेळा भेट होऊन चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.
बदलेली राजकीय स्थिती आणि तिकीट कापलं जाण्याच्या शक्यतेने, भाजपचा ठाण्यातील खासदार काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या या खासदाराला राष्ट्रवादीकडून पुन्हा प्रवेश देण्यास अजित पवारांचा नकार आहे. त्यामुळे हा खासदार आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याशिवाय कल्याणमधील एक माजी आमदारही काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली
दरम्यान, यापूर्वी ठाण्यातून लोकसभेच्या जागेवर काँग्रेस नेते सुरेश तावरे आणि विश्वनाथ पाटील यांनीही निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे आता जर विद्यमान भाजप खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर काँग्रेस या जागेचा गुंता कसा सोडवणार हे पाहावं लागेल. तूर्तास तरी या भाजप खासदाराने काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही, सध्या प्राथमिक चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना-भाजपचे युतीसाठी 5 फॉर्म्युले
भाजपचा अंतर्गत सर्व्हे
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचा दुसरा गुप्त सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार शिवसेना-भाजप जर लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढले तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी शिवसेना-भाजप युतीने तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये शिवसेनेने 18 आणि भाजपने तब्बल 22 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला केवळ 2 तर राष्ट्रवादीला 4 जागा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली होती.
भाजपचा सध्याचा अंतर्गत सर्व्हे
भाजपने नुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, शिवसेना-भाजपने युती केल्यास त्यांना 30 ते 34 जागा मिळू शकतात. मात्र जर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप 15 ते 18 आणि शिवसेना केवळ 5 ते 8 जागा जिंकेल. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला 22 ते 28 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
बिहारमधील जागा वाटप
भाजपने लोकसभा निवडणूक 2019 साठी बिहारमध्ये जागावाटप करुन रणशिंग फुंकलं आहे. बिहारमध्ये भाजपने एक पाऊल मागे घेत जिंकलेल्या 22 पैकी केवळ 17 जागाच लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता महाराष्ट्रात भाजप शिवसेनेसोबत कोणता फॉर्म्युला अवलंबणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेनेही वाढीव जागांची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप महाराष्ट्रातील विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजपचे युतीसाठी 5 फॉर्म्युले
संबंधित बातम्या
सिंधुदुर्गात भाजपला धक्का, काका कुडाळकर पुन्हा स्वगृही
Loksabha 2019 : आज निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपचा सुपडासाफ : सर्व्हे