कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरशासमोर उभं राहावं, त्यांना पुढील विरोधी पक्षनेता दिसेल, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat Kolhapur) यांनी उत्तर दिलं. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. पुढच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. आगामी निवडणुका मित्रपक्षांना घेऊनच लढणार असल्याचं त्यांनी (Balasaheb Thorat Kolhapur) स्पष्ट केलं असून वंचित बहुजन आघाडी बरोबर अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल, असं वक्तव्य केलं. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी नेहमीच चुकीची ठरली आहे, असं सांगत त्यांनी आरशासमोर उभं रहावं, त्यांना पुढील विरोधी पक्षनेता दिसेल, असं थोरात म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र बनवण्याची घोषणा केली आहे. या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता होण्यासाठी जेवढ्या जागा लागतात तेवढ्याही जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या निवडून येणार नाहीत, असं मुख्यमंत्री प्रत्येक सभेत सांगत आहेत. त्यालाच थोरात यांनी उत्तर दिलं.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
‘ज्यांनी वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हटलं, ती काँग्रेस राष्ट्रवादीच बी टीम व्हायला लागली. आणि वंचित बहुजन आघाडी ए टीम व्हायला लागली. आता तुम्ही ही काळजी केली पाहिजे, की मला असं दिसतंय की पुढच्या विधानसभेत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल. तो काँग्रेस राष्ट्रवादीचा नसेल.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वंचितकडून स्वबळाची तयारी सुरु
वंचित बहुजन आघाडीने एक सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम काँग्रेसला दिला आहे. वंचितने काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर दिली आहे. सोबतच राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागांसाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीला आपल्या सोबत घ्यावं, अशी काँग्रेसची इच्छा आहे. यासाठी बैठकीचं आयोजनही करण्यात आलं होतं.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला वंचितचा फटका
लोकसभा निवडणुकीच्या वेळीही चर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकरांनी अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर केले होते. काँग्रेस आणि वंचितमध्ये बैठक झाली तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी 48 पैकी 22 उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही जाहीर केलेल्या जागा सोडून इतर जागांबाबतच काँग्रेसने बोलावं, असं वंचितकडून सांगण्यात आलं होतं आणि अखेर वंचितने स्वबळावर निवडणूक लढवली.
लोकसभा निवडणुकीत मतांचं झालेलं विभाजन पाहता वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. राज्यातील 10 ते 12 जागांवर काँग्रेसचा उमेदवार जेवढ्या फरकाने पराभूत झाला, त्यापेक्षा जास्त मतं वंचितच्या उमेदवाराने घेतली होती. याचाच फटका काँग्रेसला बसला आणि लोकसभेला राज्यात फक्त एक जागा जिंकता आली.