मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग राजकारणात उतरणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहेत. मात्र या चर्चेला वीरेंद्र सेहवागने पूर्ण विराम दिला आहे. भाजप वीरेंद्र सेहवागला हरियाणातील रोहतकमधून उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. मात्र वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर याबाबतचा खुलासा करत, हे सर्व खोटं असल्याचं नमूद केलं. आपण निवडणूक लढणार नसल्याचं सेहवागने म्हटलं. निवडणूक लढण्याबाबतच्या ज्या ज्या बातम्या ट्विट करण्यात आल्या होत्या, त्याला सेहवागने कोट करत या अफवा असल्याचं म्हटलं.
काही गोष्टी कधीच बदलत नाहीत, जशा या अफवा. 2014 मध्येही अशाच अफवा पसरवल्या जात होत्या, त्यात काहीच बदल न करता त्या 2019 मध्येही पसरवल्या जात आहेत. मी त्यावेळीही इच्छुक नव्हतो, आताही इच्छुक नाही, बात खतम, असं ट्विट सेहवागने केलं आहे.
Some things never change, like this Rumour. Same in 2014, and no innovation even in Rumour in 2019. Not interested then, not interested now. #BaatKhatam#5YearChallenge pic.twitter.com/XhY7TkxfpD
— Virender Sehwag (@virendersehwag) February 8, 2019
भाजप हरियाणातील काँग्रेस नेते दीपेंद्रसिंह हुड्डांविरोधात सेहवागला उमेदवारी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. लोकसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्रसिंह हुड्डा यांचा पराभव करण्यासाठी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागला उमेदवारी देण्याची चर्चा सुरु होती. मात्र हरियाणा भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांनी सेहवागच्या उमेदवारीच्या चर्चेबाबत नकार देत, सेहवाग तर भाजपमध्ये सहभागीही झालेला नाही, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता खुद्द सेहवागनेच आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं.
हे वाचा : वीरेंद्र सेहवाग हरियाणातून लोकसभा निवडणूक लढवणार?
आगामी लोकसभा निवडणूकीच पडघम संपूर्ण देशात वाजत आहे. भाजप आणि काँग्रेसकडून विजयासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मात्र उमेदवारी कुणाला द्यायची यावरही दोन्ही पक्षात बैठकांचं सत्र सुरु आहे. जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी दोन्ही पक्षाकडून तगडा आणि दर्जेदार उमेदवार शोधला जात आहे. नुकतेच अभिनेत्री माधुरी दीक्षीतच्या नावाची चर्चा सुरु होती. माधुरी पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती, मात्र माधुरीनेही या चर्चा म्हणजे अफवाच असल्याचं स्पष्ट केलं होतं.
हंसराज हंसच्या नावाचीही चर्चा
वीरेंद्र सेहवागशिवाय सुफी गायक हंसराज हंसच्या नावाचीही भाजपचा संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. हंसराज हंस नुकतंच काँग्रेस सोडून भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. सिरसा लोकसभा मतदारसंघात ते भाजपचे उमेदवार असू शकतात. भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा गमावली होती.
‘ही केवळ सोशल मीडियावरील चर्चा’
दरम्यान, आम्ही अद्याप 2019 च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली नाही, असं सुभाष बराला यांनी सांगितलं. हंसराज हंस एक नेते आहेत, मात्र सेहवागने अद्याप पक्षात प्रवेश केलेला नाही. या सर्व चर्चा केवळ सोशल मीडियावरच सुरु आहेत, असं ते म्हणाले.
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने हरियाणातील 10 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. हिसार आणि सिरसा या मतदारसंघात आयएनए लढली होती, तर रोहतकमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता.