मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीबाबत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) आणि घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांच्याशी टीव्ही 9 मराठीने बातचीत केली. सध्याच्या राजकीय पेचासंदर्भातील वाद सुप्रीम कोर्टात आहे. आज त्यावर सुनावणी होणार आहे. या सगळ्यावर बोलतानाा उल्हास बापट यांच्यासह ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर बोलताना, निकम किंवा बापट राजकीय पक्षाशी (Maharashtra Political Parties) संबंधित आहे, अशी कुजबूज ऐकू येते. त्यावर निकम यांनी परखड मत मांडलं.
उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय की, ‘बापट साहेबांची परिस्थिती अशी आहे, की त्यांना प्रतिशिवसेनेचे म्हटलं जातं, मला भाजप म्हटलं जातं. पण आम्ही दोघेही तसे नाही. मला आणि बापट साहेबांना तुम्ही कोणत्याही पक्षाशी बांधू नका. आम्हाला राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांवर प्रश्न विचारु नका. त्यावर भाष्य करणं म्हणजे आम्ही एखाद्या कोणत्या तरी पक्षाशी बांधिल आहोत, असा गैरसमज श्रोत्यांना होऊ शकतो. पण आम्ही कोणत्याही पक्षाशी बांधिल नाही’, असं निकम यांनी स्पष्ट केलंय.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सत्याचा विजय होईल, असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टातली लढाई आपण जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. त्याबाबत प्रश्न विचारला असता उज्ज्वल निकम यांनी हे भाष्य केलं.
तर दुसरीकडे उल्हास बापट यांनी मी सगळ्यांच पक्षांच्या विरोधात बोलू शकतो. आणीबाणीत काँग्रेसच्या विरोधात बोललो आहे. शिवसेनेच्या विरोधातही मी बोलू शकतो. तसंच भाजपच्याही विरोधात बोलू शकतो. पण माझी एकनिष्ठता घटनेशी आहे, राजकीय पक्षांशी नाही, असं म्हणत त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. सुप्रीम कोर्टातील कायद्यांच्या आधारवर आता घटनापीठ काय निर्णय देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं ते यावेळी म्हणाले.