नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुलगा सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपवला.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज होते. त्यातच सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने पक्ष सोडल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दबाव वाढला होता. पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर विखे पाटलांनी आपला राजीनामा सोपवला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे त्याबाबत विनंती केली होती. मात्र नगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे या जागेचा तिढा होता. तरीही विखे पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीकडे ही जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती केली होती. मात्र राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 12 मार्चला कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत होते. अखेर आज त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपवला.
सुजयविरोधात प्रचार करणार नाही : विखे पाटील
दरम्यान, सुजयच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. तसेच, नगरमध्ये सुजयविरोधात प्रचार करणार नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
पवारांच्या मनात द्वेष, राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील
सुजयविरोधात प्रचार करणार नाही : विखे पाटील
मी दुसऱ्यांची पोरं धुणीभांड्यासाठी वापरुन घेत नाही : उद्धव ठाकरे