मुंबई : सध्या महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरु आहे. सरकारची आज कॅबिनेटची बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर (Rebel) आमदारांवर भाष्य केले. आज मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) होतेय. राज्याचा कारभार थांबवता येत नव्हता. महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही मंत्री झालोय. काही आमदार सहलीला गेलेत आणि ते तिकडे रमलेत. झाडी, डोंगर बघतायेत. एवढ्या कोटीचा जनतेचा कारभार आहे तो कसा थांबवणार ? महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे आणि आमचं काम चालू आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
अविश्वास प्रस्ताव आणला तर काय ? असा प्रश्न विचारताच ही कायदेशीर बाब आहे, असं जयंत पाटील म्हणाले. आमचं सरकार आहे आणि चिंता करण्याचं कारण नाही. कायदा आहे आणि न्यायव्यवस्था आहे. सभागृहात आमच्या सरकारविषयी कोणी नाराजी व्यक्त केलेली नाही, असे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरु आहे. राजकीय घडामोडीत आणखी एक घडामोड घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या कॅबिनेट बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री अनेक महत्वाचे निर्णय जाहीर करु शकतात. (Senior NCP leader Jayant Patils reaction to the rebel MLAs who went to Guwahati)