पंढरपूरः काय झाडी, काय डोंगर.. या डायलॉगमुळे फेमस झालेले शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) आता आणखी एका कारणाने फेमस होणार अशी स्थिती आहे. शहाजी बापू पाटील यांनी नुकतंच एक वक्तव्य केलंय. पक्षाने आदेश दिला तर मी थेट बेळगावात (Belgaum) जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला अभिवादन करून येईन..फक्त पक्षाने तसा आदेश द्यायल हवा.. असं वक्तव्य पाटलांनी केलंय.
दिव्यांग दिना निमित्ताने संवाद दिव्यांगांशी या कार्यक्रमात शहाजी बापू पाटील उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
शहाजी बापू पाटील यांनी असं केलं तर हा मोठा पब्लिसिटी स्टंट ठरेल. कारणही तसंच आहे.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाप्रश्न उफाळून आलाय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रीत काही गावांवर दावा ठोकलाय. तर महाराष्ट्राती अनेक गावांनीही कर्नाटकात जाण्यासाठी आंदोलन सुरु केलंय. तर कर्नाटकातील मराठी भाषिक गावांतही संवेदनशील वातावरण आहे.
समन्वय समितीमार्फत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकात जाणार होते. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना स्पष्ट नकार दिला.
तसं पत्र कर्नाटक सरकारकडून काल महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शहाजी बापू पाटील यांनीही यावर सदर प्रतिक्रिया दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे दोन मंत्री शनिवारी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते.
मात्र तत्पुर्वी शुक्रवारीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलं. सीमाभागातील गावांमध्ये सध्या तणावाचं वातावरण असल्याने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना एक प्रकारे रोखण्याचीच भाषा कर्नाटक सरकारने केल्याने राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
आम्ही येऊ नये, असे कर्नाटक सरकारने कळवलं असलं तरीही बेळगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आम्ही 6 डिसेंबर रोजी जाणारच, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
यावर शहाजी बापू पाटील यांनीही वक्तव्य केलंय. पक्षाने फक्त आदेश द्यावा.. .मी कुठनं तरी घुसून महाराजांना हार घालून येईन.. कळूही द्यायचो नाही, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलंय.