कोल्हापूर : लांबणीवर पडत असलेल्या (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. एवढेच नाहीतर विस्तारानंतर यामधील आमदार हे शिंदे गटातून बाहेर पडतील असेही सांगितले आहे. यावर सांगोल्याचे (Shahajibapu Patil) आमदार शहाजीबापू पाटील यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे. सत्तांतर झाल्यापासून अजित पवार यांना राजकारण कमी आणि भविष्यवाणी अधिक कळू लागल्याचे शहाजी बापूंनी सांगितले आहे. शिवाय लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि जो काही निर्णय मुख्यमंत्री यांचा असेल तोच सर्वांना मान्यही असेल असे शहाजीबापू पाटलांनी सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांनी कोणतीही काळजी न बाळगता राज्यात होत असलेला विकास पहावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटंबीयांवर खालच्या पातळीवरील टीका करु नका अशा सूचना शिंदे गटातील आमदारांना देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, तशा प्रकारचे काही नसून हे सध्याचे सरकार सरळ, साधं आणि सोप आहे. यामध्ये औपचारिकता कोणतीही नसून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागणारे हे सरकार आहे. लवकरच सर्वकाही सुरळीत होऊन न्यायालयीन प्रक्रियाही पूर्ण होईल. त्यानंतर अतिशय गतीने राज्याचा विकास होईल असाही विश्वास शहाजी पाटील यांनी व्यक्त केला.महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर कराडचा संपर्क नसलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील अनेक वर्षानंतर आज कराडमध्ये आले होते.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलण्याचा अधिकार नाही. पण सध्याची परस्थिती पाहता 4 दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास शहाजीबापूंनी व्यक्त केला आहे. शिवाय मंत्र्यांचा कारभार सचिवांकडे ही केवळ अफवा आहे. मंत्री असातनाही जी प्रक्रीया असते तीच सध्या सुरु आहे. तसे कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. सचिवांची सही झाल्यानंतर मंत्र्यांच्या निगराणीनंतर एखादा निर्णय होत असतो, तीच प्रक्रिया आताही सुरु असल्याचे शहाजी बापू यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी वाढत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर ह्या वाऱ्या काही मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन नाहीतर राज्यात पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्याअनुशंगाने अधिकाअधिक मदत रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाय राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी केंद्राचे संबंधही महत्वाचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची दिल्ली वारी वाढत असल्याचे शहाजीपबापूंनी सांगितले आहे.