मुंबई : ‘काय झाडी, काय डोंगार’ (Kay Jhadi Kay Dongar) या भन्नाट डायलॉगचे दिग्दर्शक-निर्माते आमदार शहाजीबापू पाटील आता पुन्हा एका नव्या डायलॉगसाठी सज्ज झालेत. याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे.’काय झाडी, काय डोंगार’चा पार्ट 2 लवकरच येणार असल्याचं शहाजीबापूंनी (Shahajibapu Patil) सांगितलं आहे.
आम्ही गुवाहाटीला जातोय. तिथं गेल्यावर लवकरच’काय झाडी, काय डोंगार’चा पार्ट 2 येणार आहे. हा व्हीडिओ सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारवर असेल, असं शहाजीबापू म्हणालेत.
कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत. एकनाथ शिंदे यांचं हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार राज्यात सत्तेत आलं आहे. गुवाहाटीमध्ये असताना आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं.त्यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही देवीच्या दर्शनासाठी जातोय,असं शहाजीबापू यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आधी सूरतमार्गे शिंदेगटाचे सगळे आमदार गुवाहाटीला गेले. तिथे एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर गोवा मार्गे सगळे आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मंत्री आणि आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. शिंदेंचं कुटुंबही यावेळी त्यांच्यासोबत आहे.
कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं होतं की, सरकार सत्तेत आल्यावर पुन्हा देवीच्या दर्शनासाठी या. म्हणून आम्ही दर्शनासाठी जातोय, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.