मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा काल पहिला आणि आज दुसरा भाग प्रसारित झाला. कालच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला पालापाचोळा असं म्हटलं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. आमदार संजय शिरसाट यांनी काल मुलाखतीच्या पहिल्या भागावरुन टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, आज मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. यावरुन शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ‘सत्तास्थापनेला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं शिवसेना पक्षप्रमुख म्हटले होते. त्यानंतर एक-दोन दिवस तशी चर्चा देखील होती, मग शेवटच्या दोन दिवसात अशी कुठे कांडी फिरली,’ असा सवाल शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलखतीच्या दुसऱ्या भागावरुन एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शंभूराज देसाई यांनी टीकास्त्र सोडलंय. त्यांनी ‘TV9 मराठी’ला सांगितलं की, ‘उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य निराधार आहे. जेव्हा सत्ता स्थापनेचा विषय पुढे आला तेव्हा साहेब म्हणाले की, मी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन. एक दोन दिवस अगोदरही शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. शेवटच्या दोन दिवसात अशी कुठे कांडी फिरली,’असा सवाल शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ‘गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी आमची अडचण उद्धव ठाकरेंना सांगितली होती, तोंड दाबून बुक्क्यांचा मार आमदारांना बसतोय, पण काहीच निर्णय घेतला नाही. साहेबांनी जे वक्तव्य केलं ते निराधार आणि तर्कहीन आहे. दुर्दैवी आहे. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवली. शिवसेना पोखरण्याचं काम राष्ट्रवादीनं सुरु केलं होतं ते आम्ही थांबवलं,’ असंही शंभुराज देसाई म्हणालेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचा पालापाचोळा असा उल्लेख मुलाखतीदरम्यान केल्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली. काल आमदार संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. ‘शिवसेनेतून बाहेर गेलेल्यांना पानं गळाली, पालापाचोळा असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी मुलाखतीतून केलाय. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ पानं गळालीत त्यांचा अपमान करू नका. आज आम्हीही पाहत आहोत. मनोहर जोशी, लीलाधर ढाके तुमच्याबरोबर बसलेले दिसत नाहीत. हे काळाबरोबर बदलत जातं. नव्यांचं स्वागत करा, पण आपल्या घरातल्यांना विसरू नका. हे विसरले तर तुम्ही शिवसैनिकांना पाला पाचोळा म्हणू नका.. सरपोतदार, लीलाधर ढाके हे काय पाचोळा होते, मनोहर जोशी आजही आहेत. या मोठ्यांच्या सावलीत तर आम्ही वाढलो या नेत्यांनी एकेका गावात-खेड्यात जाऊन शिवसेना रुजवायचं काम केलं. त्याला पाला पाचोळा म्हणता येणार नाही. माझ्यासारख्या 38 वर्षे घालवली. उद्या तुम्हाला कुणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल?’ असा सवालही केला.