अहमदनगर : (Shivsena) शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर आता पक्षाच्या आदेशावरुन मेळावे पार पडले जात आहेत. (Ahamednagar) अहमदनगर येथील मेळाव्यात आ. शंकरराव गडाख यांनी शिंदे गटाबद्दल गौप्यस्फोट केला असला तरी आपला निर्णय हा कोर्टाच्या निर्णयानंतरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले (Shankarrao GadakH) शंकरराव गडाख हे उद्या कोर्टाचा निकाल लागल्यानंतर काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भूमिकेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आपण उद्धव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ असल्याचे ते म्हणाले आहेत. शिवाय पक्षामुळेच आपल्याला पद आणि सर्वकाही मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सध्याच्या वातावरणात कोणताही निर्णय घेणार नाही. जे काही ठरेल ते कोर्टाच्या निर्णायानंतर असे म्हणून त्यांनी दोन्ही शक्यता वर्तवल्या आहेत.
राजकीय चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता एक-एक गोष्ट समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यात आ. शंकरराव गडाख यांनी आपल्यालाही गुवाहटीवरुन फोन आल्याचे सांगितले. एवढेच नाहीतर सर्व आमदार येणार आहेत तुम्हीही या असेही सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. तर शिवसेनेतीलच काही आमदार हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचे सांगत होते. ज्यांच्या विरोधात आपण निवडणुका लढलो त्यांच्याच मांडीला- मांडी लावून बसणे हे अधिकचा काळ टिकणार नाही अशी भूमिका काही आमदारांची पहिल्यापासूनच होती असाही उल्लेख गडाख यांनी मेळाव्यात केला आहे.
शिवसेनेत जे काही मिळाले ते उद्धव ठाकरे यांच्यामुळेच. मात्र, आता निर्माण झालेल्या परस्थितीमुळे विकास कामांना ब्रेक तर बसलेच पण ज्या परस्थितीतून पक्षप्रमुखांना जावं लागत आहे याचेही दुख: असल्याचे गडाख यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, एवढे मोठे संकट असतानाही त्यांचा संयम कामी येत आहे. शिवसेना हा जहाल पक्ष आहे. असे असतानाही उद्धव ठाकरे यांनी संयमाने घेतल्यानेच सर्वकाही शांत आहे. अन्यथा आतापर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते असेही गडाख यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे एकीकडेन निष्ठा आणि दुसरीकडे राजकीय भवितव्य यामध्ये गडाख काय निर्णय घेणार हे तर काळच ठरवेल.
दरम्यानच्या काळात बंडखोरीमागे उद्धव ठाकरे हेच असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यांच्या आदेशानेच हे सर्व होत असल्याची चर्चा होती. त्या दरम्यानच्या काळात मात्र, आपल्या मनाची घालमेल सुरु असल्याचे गडाख यांनी सांगितले. एकंदरीत सध्यातरी आ. शंकरराव गडाख हे पक्षप्रमुखांबरोबर असले तरी उद्याचे चित्र काय असणार हे सांगता येणार नाही.