अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Ahmadnagar Rally) यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि सरकारी धोरणांवरुन सरकारचा खरपूस समाचार घेतला. अहमदनगर (Ahmadnagar) येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत पवारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच, पक्ष सोडून जाणाऱ्यांवर पवारांनी उपरोधिक टीकाही केली.
“आज निवडणूक आयोगाने (Maharashtra Assembly Elections 2019) आपला कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे आता संघर्ष आणि लढाईला सुरुवात झाली आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्याची ओळख ही देशासाठी महत्त्वाची कामगिरी केलेला जिल्हा अशी होते. देशाच्या स्वातंत्र्याचे बिगुल याच भागातून वाजले. त्यामुळे प्रतिगामी विचारांची, जातीयवाद निर्माण करणारी, काळ्या आईचा इमान राखणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी भाजपा आणि तत्सम संघटनेला चले जाव सांगण्याचे काम आपण करायचे आहे.”, असं शरद पवार म्हणाले.
“नगरसारखा जिल्हा हा शेतीप्रमाणे शिक्षणातही पुढे आहे. मात्र, आज त्यांना नोकऱ्या कुठेही मिळत नाहीत. ही सत्ता आमच्याकडे आल्यास रोजगारात देशातील क्रमांक एकचे राज्य म्हणून महाराष्ट्राचे कौतुक होईल यात शंका नाही”, असे आश्वासनही यावेळी पवारांनी दिलं.
“आपण मावळतीचा इतिहास बघणारे नाही, तर उगवतीचा इतिहास घडवणारे आहोत, हे विसरून चालणार नाही. अनेकजण आपल्याला सोडून गेले त्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून राहू”, असं म्हणत पवारांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांवर सडकून टीका केली.
“महाराष्ट्रातील किल्ले या देशाचे प्रतिक आहेत. छत्रपतींच्या तलवारी जिथे चालल्या तिथे आता छम-छम होणार (Sharad pawar on Fadnavis Govt)”, अशी टीका शरद पवारांनी फडणवीस सरकारवर केली.
“महत्वाचे म्हणजे आमच्या अनेक मित्रांनी भाषणात सांगितलं, की तुमची जागा आमच्या हृदयात आहे. तसेच काही जण सांगतात (पिचड यांना उद्देशून )विकास करण्यासाठी पक्षांतर केलं.15 वर्ष सत्तेत होतात ना, मग काय विकास केला”, असा सवालही पवारांनी यावेळी उपस्थित केला. पवारांच्या या धडाकेबाज भाषणाला कार्यकर्त्यातून उत्स्फूर्त दाद मिळाली. मात्र, आता पुढच्या महिन्यातील 21 तारखेला बंदोबस्त केला आहे, त्यामुळे स्वस्थ बसू नका असे आव्हान पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.
संबंधित बातम्या :
पाकिस्तानातून आयात कधीच बंद, शरद पवारांना चुकीची माहिती : नाफेड
काँग्रेस-राष्ट्रवादीचे तीन आमदार राजीनामा देणार, भाजपमध्ये प्रवेश करणार – सूत्र
शरद पवारांचा खास मोहरा मैदानात, उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार जवळपास निश्चित
काँग्रेसचं कन्फ्युजन समजू शकतो, पण पवारांना पाकिस्तानचा पुळका का? : नरेंद्र मोदी