प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 2 डिसेंबर 2023 : अनिल देशमुख यांना आमच्यासोबत यायचं होतं. पण त्यांनी मंत्रीपदाची अट ठेवली होती. भाजपने अनिल देशमुख यांना मंत्रिपद देण्यास विरोध केला होता. त्यामुळे देशमुख आमच्यासोबत आले नाहीत, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केला होता. अजितदादा यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. अजितदादा यांचे हे आरोप ताजे असतानाच अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शरद पवार हे देशमुख यांच्याकडून सत्यता जाणून घेत आहेत का ? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीला संबोधित केलं. त्यानंतर पक्ष कार्यालयात त्यांची बैठक सुरू झाली. शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे. या खोलीत अनिल देशमुख हे शरद पवार यांच्यासमोरच्या खुर्चीतच बसले आहेत. दोघांमध्ये काय चर्चा सुरू आहे याचा तपशील समजू शकला नाही. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेही या बैठकीला पोहोचले आहेत. शरद पवार गटाचे इतर आमदारही या बैठकीत येत आहेत.
दरम्यान, शरद पवारांसमोर लोकसभा मतदारसंघाचं पीपीटी सादर केलं जात आहे. कोणत्या मतदारसंघात पक्षाची ताकद किती आहे, याचा आढावा घ्यायला सुरुवात झाली आहे. मागच्या निवडणकीत पडलेली पक्षाची मतं, संभाव्य उमेदवार, सद्याची स्थिती, आघाडीत लढल तर काय फायदा होईल हे मुद्दे सादरीकरणात मांडले जात आहेत. प्रदेश कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या लोकसभेच्या अंतिम आराखड्यावर पवारांसमोर सादरीकरण होत आहे. आजच्या बैठकीनंतर अंतिम जागांवर पक्षाचं एकमत होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पवार आकडेवारीनुसार आढावा घेत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. विरोधक आता थेट शरद पवार यांच्यावरच वैयक्तिक हल्ले करू लागले आहेत. याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय. राजकारणात यापूर्वी असं कधी होत नव्हतं. जेव्हा बोलायला काहीच नसते तेव्हा व्यक्तीगत हल्ले सुरू केले जातात. विरोधकांना पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे व्यक्तिगत हल्ले सुरू आहेत, असं एकनाथ खडसे म्हणाले.
फार पूर्वीपासून आम्ही राजकारणात काम करतो. अलीकडे व्यक्तिगत हल्ले करण्याचे काम अधिक होतंय. आधी अशी वक्तव्य कधी झाली नाहीत. अलीकडच्या काळात ही प्रथा जास्त होत आहे. त्यामुळे समोरचा जसा बोलेल तसं उत्तर द्यावं लागतं, असं खडसे म्हणाले.