नवी दिल्ली : देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देशाची राजधानी असेलल्या दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज दिल्लीत दाखल झाले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), के सी वेणुगोपाल यांच्यासह आणखी काही दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्व विरोधकांना एकत्र येऊन भाजपविरोधात सामना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीतील या बैठकीनंतर देशातील सर्व विरोधक एकत्र येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांकडून रणनीती आखली जात आहे. शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यातील आजची बैठक ही याच रणनीतीचा भाग आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र सामावून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मोदींचा सामना करण्यासाठी तृणूमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यासोबतही संवाद साधला जाणार असल्याचं बैठकीत निश्चित झालंय. विरोधकांच्या या गठबंधनमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची संयोजक म्हणून यापूर्वीच निवड करण्यात आलीय. त्यानंतर आता भाजप विरोधात सगळे एकवटणार यावर शिक्कामोर्तब झालंय.
शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर तीनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीत तीनही नेत्यांनी भूमिका मांडली. “सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे आम्ही सर्व विरोधी पक्षांना भेटत आहोत. सर्वांना सोबत घेऊन आमचा देशाचा विकासाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. देश वाचवण्यासाठी आम्ही विरोधक एकत्र आलो आहोत. आम्ही सर्व मोदींविरोधात एक होऊन लढणार आहोत”, अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.
यावेळी शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. “मल्लिकार्जुन खर्गे यांनी जे सांगितलं तेच विचार आमच्या सगळ्यांचे आहेत. पण फक्त विचार करुन फायदा नाही. हे प्रत्यक्षात व्हायला हवं. त्यामुळे त्या दृष्टीकोनाने आता कामही होत आहे. खर्गे यांनी बैठक घेतलीय. ही सुरुवात आहे. यानंतर इतर विरोधी पक्षही एकत्र येतील. याबाबत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनरजी, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बातचित अद्याप झालेली नाही. त्यांच्यासोबत बातचित करुन ते देखील जुळू शकतात. त्यांच्याशी संवाद केला जाणार आहे. त्यासाठी काही लोकांची निवड करुन संवाद करण्याचा प्रयत्न केला जाईल”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवारांनानंतर राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली. “विरोधकांना एकत्र करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही सुरुवात आहे. आम्ही सगळे या प्रक्रियेसाठी कटिबद्ध आहोत”, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.