शिर्डी : राष्ट्रवादीला (NCP) पडलेलं खिंडार रुंदावत असताना पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्विग्न झाल्याचं दिसत आहे. ‘नेते पक्ष सोडत आहेत, मात्र आता नातेवाईकही दूर जात आहेत’ या प्रश्नावर पवार पत्रकारावर (Journalist) संतापले. शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषदेतूनच निघून जाण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर पत्रकाराला माफी मागण्यासही लावली.
उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील (NCP Rana jagjitsinh patil) आणि त्यांचे वडील, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Dr. Padmasinh Patil) भाजपचा झेंडा हाती घेण्याचे संकेत आहेत. पाटील पिता-पुत्र हे पवार कुटुंबाचे नातेवाईक आहेत.
काय झालं पत्रकार परिषदेत?
पत्रकार – ‘कार्यकर्ते आज पक्ष सोडत आहेत, इथपर्यंत ठीक आहे.. म्हणजे सत्तेसाठी..’
शरद पवार – कार्यकर्ते नाही, नेते सोडतात
पत्रकार – तुमचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटीलही पक्ष सोडत आहेत
शरद पवार – नातेवाईकाचा आणि ह्याचा काय संबंध? पण तुम्ही नातेवाईकाचा काय विषय काढता? हे चुकीचं
बोलताय तुम्ही, नातेवाईकाचा संबंध आहे का इथे राजकारणात?
पत्रकार – परंतु…
शरद पवार – हे बघा, हे असं बोलायचं असेल, तर मला बोलायचंच नाही (शरद पवार निघून जाण्याच्या तयारीत)
पत्रकार – सॉरी सर
शरद पवार – मला बोलायचंच नाही, माफी मागा
पत्रकार – नाही, नातेवाईक म्हणजे..
शरद पवार – तुम्ही माफी मागा, नातेवाईकांचं काही कारण नाही
पत्रकार – नातेवाईक म्हणजे जे आयुष्यभर तुमच्या सोबत होते..
शरद पवार – ते बोला, पण नातेवाईक शब्द काढलात.
शरद पवार – आत्ता माझ्यासोबत कदम होते. ते कोणत्या पक्षाचे आहेत? ते नातेवाईक होते? अशा लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही. माझी विनंती आहे, अशा लोकांना बोलवत जाऊ नका, निदान मला. यांना बोलवणार असाल, तर मला बोलावू नका. आपण निघून गेलात तर बरं होईल.
शरद पवार उद्विग्न, नातेवाईक पद्मसिंह पाटील सोडून जात असल्याचा प्रश्न विचारताच पत्रकारावर भडकले, पत्रकार परिषदेतून निघून जाण्याचा प्रयत्न, माफीची मागणी #SharadPawar pic.twitter.com/B7vFXJh4iG
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2019
राणा जगजीतसिंहांकडून पक्ष सोडण्याचे संकेत
‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशा आशयाचे फलक लावून जगजीतसिंह पाटलांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी केलेली दिसत आहे. शरद पवार यांचे विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी मानल्या जाणाऱ्या पाटील यांनी पक्ष सोडल्यास मराठवाड्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जाईल.
‘दादा… नवी दिशा, नवी आशा… मला तुमच्याशी काही बोलायचंय!! परिवार संवाद, आवर्जून उपस्थित राहा’ असे फलक लावण्यात आले आहेत. यावर पाटील पितापुत्रांचे फोटो आहेत. पक्ष सोडण्यापूर्वी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आणि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना बोलावलं आहे. यावेळी ते भाजप प्रवेशाची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. राणा जगजीतसिंह पाटील हे राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा गेल्या एक महिन्यापासून होती. पाटील परिवाराने राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडाडून टीका केली होती. ज्यांनी मंत्रीपदे भोगली व ज्यांच्या नावावर पक्षाचा सात बारा उतारा होता ते फितुरी करून पक्ष बदलत असतील तर त्यांचा पराभव करा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं होतं.
भाजपमध्ये पुढच्या मेगाभरतीचा मुहूर्त ठरला आहे. एक आणि पाच सप्टेंबरला पुढची मेगाभरती होणार असल्याची माहिती आहे. याचवेळी पाटील पितापुत्र भाजपप्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वीच राष्ट्रवादीचे आणखी एक संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
डॉ पद्मसिंह पाटील यांच्यामुळे पवार आणि राष्ट्रवादी अडचणीत आल्याची प्रकरणे
पवनराजे दुहेरी हत्याकांड
3 जून 2006 रोजी नवी मुंबई येथील कळंबोली येथे पवनराजे व त्यांचा ड्रायवर समद काझी हत्याकांड
6 जून 2009 रोजी विद्यमान खासदार असताना हत्याकांड प्रकरणी सीबीआयकडून मुख्य आरोपी म्हणून अटक
सावंत आयोगात भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध
न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगात भ्रष्टाचारात दोषी सापडल्याने मंत्रीपदाचा राजीनामा. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केला होता भ्रष्टाचाराचे आरोप
अण्णा हजारे हत्या सुपारी व कट
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देऊन कट रचल्या प्रकरणी डॉ पाटील यांना अटक, 10 वर्ष झाले तरी अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू, दोषारोप पत्र दाखल नाही