देशात मोदींना विरोध करणाऱ्यांना तुरुंगात घातले जात आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात घातले. आता केजरीवाल यांना अटक केली आहे. एक सामान्य तरुण दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. चांगले राज्य करणाऱ्यांना आत टाकले जात आहे. भाजपाचा कर्नाटकातील मंत्री म्हणत होता संविधान बदलण्यासाठी सत्ता हवी आहे. लोकशाही या देशासाठी महत्वाची आहे. सामान्य माणसांच्या अधिकाराचे रक्षण संविधान करते. घटनेच्या अधिकारांची पायमल्ली केली की तेथे हुकुमशाही येते. बांग्लादेशात लष्करानं देश हातात घेतला, पाकिस्तानात लष्कराने देश हातात घेतला. लष्कराने देश हातात घेऊ द्यायचा नसेल तर संविधानाचे रक्षण करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले. बारामती येथील शेतकरी कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
गेली दहा वर्षे मी संसदेत तुमच्यावतीने काम करीत आहे. मोदीचं संसदेवर किती लक्ष आहे हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मोदींनी संसदेत जाताना साष्टांग नमस्कार घातला होता. मागचं अधिवेशन एक महिन्याचे होते. मोदी किती वेळा आले, पंतप्रधान मोदी एकदाच आले आणि काही बोलून निघून गेले. यावरून त्यांचा संसदीय लोकशाहीवर किती विश्वास हे त्यांनी दाखवलं असे शरद पवार यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. भाजपाचे कर्नाटकातील खासदार म्हणाले की या देशाची घटना बदलायची आहे. या देशाची घटना तुमचा अधिकार आहे. आज लोकशाही संकटात येत आहे. या निवडणुकीत आपण यांना रोखलं पाहीजे असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
बारामतीत एमआयडीसी केली, कारखाने आम्ही आणले. कारखानाचे कसे आणायचे असा प्रश्न होता. पर्यावरणात नुकसान होतील असं कारखाने येऊ द्यायचे नाही असे ठरविले. दुधाच्या सोसायट्या आम्ही काढल्या. दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल हे पाहिलं. दूधाच्या भूकटी पासून आपण चॉकलेट केलं. इंग्लंडला, दुबईतून चॉकलेट खरेदी करता ते बारामतीची चॉकेलेट असतात. तुम्ही तयार केलेला माल परदेशात जातो. मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत. बारामती शैक्षणिक केंद्र झाले आहे. मुलींना शिक्षण मिळाले. दुसरी गोष्ट हाताला काम मिळाले आहे. मुली शिकल्या तर घर सुधारते. शारदा संकुलात हजारो मुली शिकतात. सोलापूर, माढा अनेक जिल्ह्यातील मुली येथे शिकतात. मुलीचं सरक्षण केलं जातं. हे परिवर्तन आपल्याला चालू ठेवायचं असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.