पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे ब्राह्मण विरोधी असल्याची चर्चा राज्यात दबक्या आवाजात सुरु असते. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे ब्राह्मण समाजाने (Brahmin Community) तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करण्याची आणि आपल्या नेत्यांना समज देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पवार यांच्याकडून त्याबाबत कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही पवार यांच्यावर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात शरद पवार आणि काही ब्राह्मण संघटनांची बैठक पार पडली. त्यावेळी ब्राह्मण समाजाने 4 मागण्या ठेवल्याचं पवारांनी सांगितलं. त्यात आरक्षणाचाही मुद्दा होता, असं पवार म्हणाले. मात्र, पवारांसोबतच्या बैठकीत आरक्षणा संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असा दावा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केलाय.
ब्राह्मण संघटना आणि पवार यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी बोलताना पवार म्हणाले की, अलिकडच्या काळात ग्रामीण भागातला वर्ग नागरी भागात येतोय. त्यामुळे साहजिकच सर्व्हिस सेक्टर, नोकरीत अधिक संधी मिळायला हवी. ब्राह्मणांना आरक्षण असावं, अशी ब्राह्मण संघटनांची भूमिका आहे. मात्र सद्यस्थितीत ब्राह्मणांच्या आरक्षणाचं सूत्र बसेल असं वाटत नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. असे असेल तर आरक्षण कुणालाच देऊ नका, ही भूमिका मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र समाजात अनेक जाती धर्म हे मागासलेल्या स्थितीला आहेत, त्यांना प्रगतीसाठी, आपल्यासोबत आणण्यासाठी आऱक्षण द्यावं लागेल. असेही पवारांनी सांगितले. आरक्षणाला विरोध करु नये, असं शरद पवार म्हणाले होते.
शरद पवार यांनी ब्राह्मण आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांसोबतच्या बैठकीत आरक्षणाबाबत चर्चाच झाली नव्हती असा दावा केलाय. पवार यांनी बोलावलेल्या ब्राह्मण संघटनांच्या बैठकीत आरक्षणा संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी म्हटलंय.
ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे हे पवारांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. मात्र, पवारांच्या आरक्षणाविषयीच्या दाव्यावरुन त्यांनी जोरदार टीका केलीय. शरद पवारांनी केलेले ट्वीट नाही तर ट्विस्ट आहे. कालच्या बैठकीला वेगळं रुप देण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही विशिष्ट जातीच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. तर जातीय आरक्षणाला आमचा विरोध आहे. आरक्षणाचा फायदा हा केवळ गरिबांना व्हावा. मग तो कोणत्याही जातीचा असो, हीच आमची भूमिका होती आणि आहे. हीच भूमिका आधी मराठा समाजाचीही होती. असं असताना पवार साहेबांनी पूर्ण बैठकीच स्वरुपच वेगळ्या प्रकारे मांडलं. जसं काही ती बैठक आरक्षणाला विरोध म्हणून घेतली गेली, असं आनंद दवे म्हणाले.