बारामती : राज्यातील सांगली, कोल्हापूर भागात पुराने अक्षरशः हाहाःकार माजवलाय. या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री शरद पवार (Baramati Sharad Pawar) यांनी बारामतीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बैठक घेत अर्ध्याच तासात तब्बल एक कोटी रुपयांची रोख मदत उभी केली. विशेष म्हणजे या रोख रक्कमेशिवाय अन्नधान्य, कपडे, औषधांसह गरजेच्या वस्तूही पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पवारांच्या (Baramati Sharad Pawar) आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने जनजीवन विस्कळीत झालंय. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरु झालाय. शरद पवार यांनी विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पूरग्रस्तांसाठी मदतीबाबत आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी अर्ध्याच तासात एक कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली. या रोख रक्कमेशिवाय धान्य, कपडे, औषधे आणि गरजेच्या वस्तूही देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही सर्व मदत येत्या दोन दिवसात सांगली, कोल्हापूरसह विविध भागात पोहोचवली जाणार आहे.
याचवेळी शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 25 लाख असे एकूण 50 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या बैठकीत विविध संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने रोख स्वरुपात मदत देण्याचं जाहीर केलं. तर अनेक संस्था आणि व्यक्तींच्या वतीने वेगवेगळ्या वस्तू स्वरूपातील मदत पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे.
येत्या दोन दिवसात बारामतीतून आणखी मदत जमा करुन ती पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या वतीने गुरुवारी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचं वेतन या नैसर्गिक आपत्तीसाठी देतील आणि हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. या परिस्थितीमध्ये सर्वांनी मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहनही शरद पवारांनी केलं होतं.