सातारा: राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar in Satara)) यांनी राज्यभरात दौरा काढून विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. आज (22 सप्टेंबर) ते साताऱ्यात असून त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात (BJP) गेलेल्या उदयनराजे भोसलेंविरोधात (Udayanraje Bhosale) दंड थोपटले आहे. उदयनराजेंच्या मतदारसंघात जाऊन शरद पवारांनी भव्य रॅली काढली आणि शक्तीप्रदर्शन केलं. त्यामुळे उदयनराजेंसाठी येणारा काळ आव्हानात्मक असेल, असा स्पष्ट संदेश पवारांनी दिल्याचं बोललं जात आहे.
शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रॅलीला सुरुवात केली. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील यांच्यासह हजारो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात आमच्या अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेने अनेक पिढ्या घडवल्या. मला समाधान वाटतं जे लोक उच्चशिक्षित झाले त्यांनी पाठ फिरवली नाही. कोणत्याही मानधनाचा विचार न करता अनेकांनी याच संस्थेत काम करणं पसंत केलं.@rayatshikshan pic.twitter.com/GcEiFiAMtb
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 22, 2019
शरद पवारांनी आज साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेलाही भेट दिली. यावेळी त्यांनी रयतच्या वाटचालीविषयी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “स्वातंत्र्यपूर्व काळात कर्मवीर भाऊराव पाटलांनी (अण्णांनी) ज्ञानदानाचं पवित्र काम हाती घेतलं. त्यांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवली. शिक्षण सर्वांना मिळावा हा त्यांचा नेहमीच आग्रह होता. त्यांनी समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. ज्या परिसरात रयतच्या शिक्षण संस्था आहेत तेथे लोकांचे अण्णांसोबतचे संबंध खूप चांगले होते.”
कर्मवीर भाऊरावांचं आपल्या घरी देखील कायम येणं जाणं होतं, असंही नमूद केलं. भाऊरावांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवलं. त्यांनी ज्यांना शिकवलं ते पुढे मोठे झाले आणि त्यांनी भाऊरावांसोबत काम केलं. भाऊरावांनी ज्या लोकांना मदत केली त्या लोकांनी शिक्षणानंतर अण्णांच्या संस्थेत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच आज संस्थेचा डोलारा इतका मोठा झाला. त्या लोकांमध्ये त्यागी संस्कार रुजवले होते, असंही पवारांनी नमूद केलं.
“राजकीय जोडे बाहेर ठेऊन संस्थेत यायचं”
पवार म्हणाले, “कर्मवीर भाऊरावांनी शिक्षण क्षेत्रात काम करताना अत्यंत शिस्तबद्धपणे काम केल्याचंही पवारांनी सांगितलं. अण्णांनी नेहमीच राजकीय जोडे बाहेर ठेऊन मगच संस्थेत येण्याचा आग्रह धरला होता. हे त्यांनी नेहमीच कटाक्षाने पाळले.”