भाजपला पाठिंबा देण्यामागे तुमचा हात? शरद पवार म्हणतात…

| Updated on: Nov 25, 2019 | 12:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले आणि आरोपही झाले.

भाजपला पाठिंबा देण्यामागे तुमचा हात? शरद पवार म्हणतात...
Follow us on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले आणि आरोपही झाले. भाजपला पाठिंबा देण्यामागे स्वतः शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोपही यापैकीच एक (Sharad Pawar on allegations of supporting BJP). याविषयी विचारले असता शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, “माझ्या पक्षातील सहकाऱ्यांना मी काही मुद्दे पटवून दिले तर ते माझं म्हणणं नाकारतात असा माझा अनुभव नाही. मला जर भाजपला पाठिंबा द्यायचा असता तर मी त्यांना सांगून पाठिंबा देऊ शकलो असतो. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्यात माझा हात आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही.”


भाजपनं संकेतांना हरताळ फासून सत्तास्थापना केली. केंद्रातील सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करुन राज्यपालांच्या संकेत पद्धतीला हरताळ फासण्यात आला. संविधानाच्या चौकटीत बसलं नाही तरी हवे ते निर्णय घेणे आणि सत्ता काबिज करणे हा वेगळेपणा भाजपने देशात दाखवून दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला नाही. तो पक्षाचा निर्णय नाही. त्यामुळे आता राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे बहुमत सिद्ध करताना मतदान होईल आणि सर्व काही स्पष्ट होईल, असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

अजित पवार यांच्या नाराजीबाबत आणि त्यानंतर घेतलेल्या निर्णयावर बोलतानाही शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले, “अजित पवार यांचं वेगळं मत असेल तर ते त्यांनी पक्षाच्या बैठकीत मांडायला हवं. कुणी एक व्यक्ती पक्षाचं धोरण ठरवू शकत नाही.” सत्तास्थापनेसाठी वेळ लागला नाही. किमान कार्यक्रम ठरवताना आवश्यक वेळ घेऊन अनेक मुद्द्यावर चर्चा करणं आवश्यक असतं. त्यानंतरच राज्य कारभार कसा करायचा ते ठरवता येतं, असंही पवारांनी स्पष्ट केलं.