नाशिक : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्पष्टीकरण (Sharad pawar comment on Sanjay Raut) दिलं. “खासदार आणि शिवेसना नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यापासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. मात्र इंदिरा गांधींबद्दल त्यांनी बोलायला नको होतं,” असे शरद पवार म्हणाले.
“संजय राऊत यांच्या वक्तव्यापासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. मात्र इंदिरा गांधींबद्दल त्यांनी बोलायला नको होतं, हे आमचं मतं आहे. त्यांनी ते मागे घेतलं आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे,” असेही शरद पवार म्हणाले.
“सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. ते सर्वच काही माहिती नसतात. महमद अली रोडवरील माझ्या एका सभेत हाजी मस्तान होता. असं वादळ उठलं होतं. मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नाही,” असेही पवारांनी स्पष्ट केलं.
“भाजप आणि मनसेला एकत्र यावं असं वाटतं असेल तर त्यांनी एकत्र यावं,” असेही शरद पवार म्हणाले. जे राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. त्याबाबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केले.
“विधानसभा निवडणूक प्रचार सुरुवात मी नाशकात केली होती. बदल व्हावा ही युवकांची भूमिका होती. त्याचा आम्हाला फायदा झाला. तीन पक्षांचं सरकार करताना आम्ही काही निर्णय घेतले आहे. यात युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण, शेती पुनर्बांधणी धोरण ठरवलं आहे,” असेही शरद पवार म्हणाले.
“या सरकारनं सत्तेचा योग्य वापर करावा अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली. 2 लाखाच्या आत 85 टक्के शेतकरी येतात. सध्या याच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्यानंतर येत्या अंदाजपत्रकात उरलेल्या 15 टक्के शेतकऱ्यांचा विचार केला जाईल,” असेही शरद पवार (Sharad pawar comment on Sanjay Raut) म्हणाले.
“अस्वस्थता निर्माण करणारं वक्तव्य करू नये अशी सूचना करणार नाही. सर्व शहाणे आहेत. सरकार 5 वर्ष चालवायचं आहे. काँग्रेस व्यवहारी आहे,” असेही शरद पवार म्हणाले.
“ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यासाठी चर्चा सुरू आहे. दिलासा कसा देता येईल हा प्रयत्न सुरु आहे. केंद्रानं अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी.” असेही शरद पवार म्हणाले.
“बेळगावात मलाही पोलिसांनी मारहाण केली होती. बेळगावातील मराठी लोकांच्या मी पाठीशी आहे. चीन सरकार प्रतिनिधी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मी एकत्रित बैठक करून दिली. द्राक्ष चायनाला पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कांदासाठा धोरण आणि निर्यातबंदी रद्द करावी याकरिता मी दिल्लीत पियुष गोयल यांना भेटणार आहे,” असेही शरद पवार (Sharad pawar comment on Sanjay Raut) म्हणाले.