पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज सांगोला दौऱ्यावर आहेत. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेणार आहेत. तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै रोजी निधन झालं.
गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवार हे गणपतराव देशमुख यांच्या घरी जातील. तिथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर विविध पक्षीयांनी शोक व्यक्त केला होता. पवारांनीही ट्विटरवरुन गणपतरावांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 30, 2021
गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार
गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.
आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं.
गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.
गणपतराव देशमुख हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे सर्वाधिक लोकप्रिय होते. 11 वेळा आमदार राहूनही त्यांची राहणीमान अत्यंत साधी राहिली आहे. एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा आमदार म्हणूनही त्यांच्याबद्दल राज्यातील नागरिकांना नेहमीच कुतुहूल वाटायचे. त्यामुळेच त्यांच्या साधी राहणीमानाची नेहमीच चर्चा व्हायची. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणाऱ्या माणसाचा नेता अशी त्यांची ख्याती होती. सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले.
शेतकरी कामगार पक्ष राज्यात प्रभावहीन झाला आहे. तरीही देशमुख यांनी सांगोला मतदारसंघ राखला. या मतदारसंघातून ते तब्बल 11 वेळा निवडून आले. 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या देशमुखांना केवळ 1972 आणि 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला. 1972 मध्ये काकाळासाहेब साळुंखे-पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तर 1995मध्ये काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी त्यांना पराभूत केले. हे दोन पराभव वगळता देशमुख यांनी सातत्याने विजय मिळवला आहे. मात्र, प्रकृती आणि वय या दोन कारणामुळे 94 वर्षीय देशमुख यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली नाही.
गणपतराव देशमुख सर्वाधिक काळ विधानसभेत राहिले असले तरी बहुतेक काळ ते विरोधी पक्षातच होते. 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले. त्यावेळी देशमुखांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. हा अपवाद वगळता ते नेहमी विरोधी पक्षातच राहिले.
पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूची 5वी युवा संसद जानेवारी 2020मध्ये पार पडली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. 1999मध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार असा पेच निर्माण झाला. कारण आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती. पण बहुमत नसल्याने आमदार आपल्यासोबत येणार नाहीत, हेही दिसत होते. त्यावेळी शेकापचे तीन आमदार निवडून आले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडेही मुख्यमंत्री नको आणि नारायण राणेही मुख्यमंत्री नको… गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा… असा विचार आला. त्यावर सर्व सहमतही होते. पण नंतर ते झालं नाही, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता.
संबंधित बातमी :
राज्याच्या राजकारणातील एक पर्वाचा अस्त, गणपतराव देशमुखांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा आढावा