बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (16 ऑक्टोबर) बीडमधील आपल्या जाहीरसभेत राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर (Sharad Pawar on Jaydatt Kshirsagar) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सारखं असं कुंकू बदलायचं नसतं, घरोबा एकदाच करायचा असतो, असं म्हणत शरद पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी तीन तीन वेळा मंत्री होऊनही हे कसे गुदमरतात? असाही प्रश्न उपस्थित केला.
शरद पवार म्हणाले, “कुणालाही व्यक्तीगत मोठं करायचं नव्हतं. यांना तीन तीन वेळा मंत्री केलं. तरी हे गुदमरत आहेत असं म्हणत आहेत. गुदमरत आहे असं सांगून यांनी नवा घरोबा केला. पण सारखं सारखं असं कुंकू बदलू नये. घरोबा एकदाच करायचा असतो आणि तेथेच प्रामाणिकपणे राहायचं असतं. एकदा घरोबा करुन प्रामाणिकपणा सोडला आणि नवा घरोबा केला, तर लोक काय म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. येथे चार लोकांमध्ये मी सांगत नाही.”
महाराष्ट्रात नविन लोकांची फळी उभा करण्याची सुरुवात बीड जिल्ह्यातून झाली आहे. संदीप क्षीरसागर यांच्यापासून ही सुरूवात होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. याआधी अनेकांना संधी दिली होती, पण ज्याला सत्तेची ऊब लागली ते बदलले, असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी शरद पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या आई केशरबाई क्षीरसागर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभारही मानले.
शरद पवार म्हणाले, “केशरबाईंनी कधीही दिलेला शब्द बदलला नाही. पण दुसऱ्या पिढीने सगळं मिळूनही पक्षांतर केलं. आता काकूंचा स्वाभिमान आणि निष्ठेची परंपरा संदीप क्षीरसागर यांच्या रूपानं पुन्हा आली आहे.”