नविद पठाण, पुरंदरः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) सरकारची आश्वासनं पोकळ असतात, त्यामुळे जरा सांभाळूनच घ्या, असा सल्ला शरद पवारांनी (Sharad Pawar) आज एका कार्यक्रमात दिला. विशेष म्हणजे हे सांगण्यासाठी शरद पवार यांनी एक उक्ती वापरली. हे म्हणजे लबाडाच्या घरचं आवतन आहे. जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, असं पवारांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्ज माफीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला, त्यावर शरद पवार यांनी टीका केली. पुरंदर येथील एका शेकतऱ्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रावदी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या 34, 788 कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. यामुळे सुमारे 69 हजार हेक्टर शेतजमिनीवरचा भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे, असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय.
अशा बँकेचं कर्ज माफ केल्याचं करुन टाकलं. हे म्हणजे लबाडाच्या घरचं आवतन असतं, जेवल्याशिवाय खरं मानायचं नसतं, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय…
या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरण स्वीकारले जात नाही. राज्यातील नुकसानीचा आम्ही आढावा घेत आहोत. केंद्र आणि राज्य सरकारला याची माहिती पाठवणार आहोत.
पुरंदरविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा आलो, तेव्हा तुम्ही मला मोकळ्या हाताने पाठवलं नाही. तुमची साथ मला प्रत्येक निवडणुकीत लाभली…
काहींना वाटतंय मी म्हातारा झालोय. पण तुम्ही अजून काय बघितलंय, असा सवाल शरद पवार यांनी केला. यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.